खासगी ट्रॅव्हल्सला लगाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 12:56 AM2018-05-09T00:56:42+5:302018-05-09T00:56:42+5:30
विना परवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्या १२ खासगी ट्रॅव्हल्स चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक शाखेने जप्त केल्या. या ट्रॅव्हल्स नागपूर व गडचिरोली मार्गावर धावत होत्या. ही कारवाई मंगळवारी सकाळी करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या ट्रॅव्हल्स नामांकित व वातानुकुलीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : विना परवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्या १२ खासगी ट्रॅव्हल्स चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक शाखेने जप्त केल्या. या ट्रॅव्हल्स नागपूर व गडचिरोली मार्गावर धावत होत्या. ही कारवाई मंगळवारी सकाळी करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या ट्रॅव्हल्स नामांकित व वातानुकुलीत आहेत.
चंद्रपूर येथून पुणे, नागपूर, गडचिरोली या ठिकाणी दिवसातून अनेक ट्रॅव्हल्स धावतात. मात्र बहुतेक ट्रॅव्हल्स धारकांकडे परवाना नाही. तसेच या वाहनांद्वारे मोठ्या प्रमाणात अतिरिक्त भाडे आकारून अवैध प्रवासी वाहतूक केली जात असल्याची माहिती आरटीओ व वाहतूक पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर आरटीओ विभाग व वाहतूक पोलिसांचे संयुक्त दोन पथक तयार करुन नागपूर व गडचिरोली मार्गावर खासगी वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी अनेक वाहने विनापरवाना धावत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे १२ ट्रॅव्हल्स जप्त करण्यात आले.
यामध्ये एमएच ३४ एव्ही २०७७, एमएच ४० बीजी १५१८, एमएच २९ एव्ही ८२२२, एमएच ३३-१०२५, एम एच २७ ई ९३२८, एमएच ३४ एबी ८०४१, एमएच ३२ क्यू ४३७०, एमएच ३४ एव्ही १५७७, एमएच २९ एम ८१६० अशा क्रमांकाच्या ट्रॅव्हल्स असून डीएनआर, पर्पल, महालक्ष्मी या वातानुकूलित ट्रॅव्हल्सचा समावेश आहे. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व्ही. एन. शिंदे यांच्या नेतृत्वात वाहतूक निरीक्षक संपत चव्हाण, मोटार वाहन निरीक्षक आडे, गुलाने, तासके, काळे आदींनी केली.
ट्रॅव्हल्स चालकांनी जास्त तिकीट आकारल्यास प्रवाश्यांनी तक्रार करावी, कारवाई केली जाईल, असे आवाहन चंद्रपूर आरटीओ कार्यालयाने केले आहे.