ग्रामसभेचे निर्बंध झाले शिथिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:29 AM2021-09-27T04:29:41+5:302021-09-27T04:29:41+5:30
नांदा फाटा : गावाच्या विकासासाठी ग्रामसभा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कोविड आजाराच्या पार्श्वभूमीवर याआधी २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामसभा रद्द ...
नांदा फाटा : गावाच्या विकासासाठी ग्रामसभा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कोविड आजाराच्या पार्श्वभूमीवर याआधी २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामसभा रद्द करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ कलम ७ नुसार २ ऑक्टोबरला ग्रामसभा घेण्यात येत होत्या. मात्र, कोविड प्रादुर्भावामुळे सदर ग्रामसभा घेण्यास शासनाने निर्बंध घातले होते. याबाबत जिल्ह्यातील मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी शासनाकडे २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामसभा घेण्याबाबत मार्गदर्शन मागितले होते. नुकतेच नियमांचे काटेकोरपणे पालन करून येत्या २ ऑक्टोबर रोजी ग्रामसभा घेण्यास ग्रामविकास मंत्रालय अप्पर सचिवांनी मंजुरी दिली आहे.
ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. शासनाची विविध योजनेतून कामे मंजूर करून घेण्यासाठी ग्रामसभेत आराखड्याला मंजुरी देण्यात येते. ग्रामसभेने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार गावात कामे केली जातात. ग्रामसभा होत नसल्याने गावातील प्रश्न कसे सोडवायचे, असा प्रश्न नागरिकांपुढे होता. मात्र, आता ग्रामसभा घेण्यास शासनाने मंजुरी दिल्याने गावात पुन्हा ग्रामसभा घेण्यात येणार आहे.