कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना खासगी वैद्यकीय व्यवसायावर निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:37 AM2021-06-16T04:37:09+5:302021-06-16T04:37:09+5:30

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत वैद्यकीय अधिकारी हे मुख्यालयी न राहता व परवानगी न घेता, मुख्यालय सोडून खासगी व्यवसाय करीत ...

Restrictions on private medical profession to contract medical officers | कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना खासगी वैद्यकीय व्यवसायावर निर्बंध

कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना खासगी वैद्यकीय व्यवसायावर निर्बंध

Next

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत वैद्यकीय अधिकारी हे मुख्यालयी न राहता व परवानगी न घेता, मुख्यालय सोडून खासगी व्यवसाय करीत असल्याने, त्याचा शासकीय सेवेतील दैनंदिन कामावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे प्राप्त होत होत्या. त्यामुळे अभियानाचे धोरण निश्चित करण्याची बाब विचाराधीन होती. त्या अनुषंगाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांना खासगी वैद्यकीय व्यवसाय करता येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आल्याचे, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी निर्गमित केलेल्या पत्रातून स्पष्ट करण्यात आले आहे.

या पत्रात नऊ अटींचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीने पूर्ण वेळ नियुक्त करण्यात येणाऱ्या डॉक्टर्सकडून सर्व अटींचा करारनामा लिहून घेणे. पत्र निर्गमित झाल्याच्या तारखेपासून कंत्राटी डॉक्टरांकडून खासगी वैद्यकीय व्यवसाय व अन्य संबंधित व्यवसाय करणार नाही, याची दक्षता घेणे. खासगी व्यवसाय करताना आढळून आल्यास नोटीस बजावून खुलासा मागणे. विहीत मुदतीत खुलासा प्राप्त न झाल्यास किंवा असमाधानकारक खुलासा असल्यास नियुक्त प्राधिकाऱ्यांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा समाप्त करणे, यांसारख्या बाबींचा समावेश पत्रात नमूद करण्यात आला आहे. तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधीक्षकांना पत्राची अंमलबजावणी करण्याची सक्त सूचना देण्यात आल्या आहे. यामुळे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी खासगी वैद्यकीय व्यवसाय बंद करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पत्र निर्गमित होऊन २० दिवसांचा कालावधी उलटल्यानंतरही कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे खासगी वैद्यकीय व्यवसाय जोमात सुरू असल्याचे राजुरा तालुक्यात दिसून येत आहे. यामुळे कार्यवाहीसाठी नियुक्ती प्राधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे की हेतूपुरस्पर दुर्लक्ष केल्या जात आहे, याबाबत नागरिकांमध्ये शंका व्यक्त केली जात आहे.

कोट

राजुरा तालुका आरोग्य कार्यालयांतर्गत कोणताही कंत्राटी वैद्यकीय अधिकारी खासगी व्यवसाय करीत नाही. तशी तक्रार आल्यास नक्कीच नियमानुसार कारवाई केली जाईल.

- डॉ.प्रकाश नगराळे, तालुका आरोग्य अधिकारी राजुरा.

कोट

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी य वैद्यकीय अधिकाऱ्यांना खासगी व्यवसायावर निर्बंध घालणारे पत्र अजून प्राप्त झालेले नाही. पत्र प्राप्त झाल्यावर किंवा या संदर्भात काही तक्रारी आल्यास संबंधितावर योग्य ती कारवाई केली जाईल.

-डॉ.लहू कुळमेथे‌ वैद्यकीय अधीक्षक, राजुरा.

Web Title: Restrictions on private medical profession to contract medical officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.