सेवानिवृत्त कर्मचारी अंशदान व रजा रोखीच्या रकमेपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:28 AM2021-03-05T04:28:20+5:302021-03-05T04:28:20+5:30
शासन परिपत्रकाकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष मूल : गेल्या पाच वर्षांपासून मूल नगरपालिकेतून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी अशंदान, उपदान व रजा ...
शासन परिपत्रकाकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष
मूल : गेल्या पाच वर्षांपासून मूल नगरपालिकेतून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी अशंदान, उपदान व रजा रोखीपासून वंचित असल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली आहे.
मात्र नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून तत्काळ थकीत रक्कम वाटप करण्याची मागणी केली.
मूल नगरपालिकेत वेगवेगळ्या विभागात कार्यरत लिपिक, शिपाई व सफाई मजूर असे ३२ कर्मचारी २०१६ पासून तर २०२० पर्यंत सेवानिवृत्त झाले. त्यांना अजूनपर्यंत अंशदान, उपदान व रजा रोखी करण्याची रक्कम नगरपालिकांकडून मिळालेली नाही, आयुक्त तथा संचालक नगरपालिका प्रशासन संचालनालय मुंबई यांचे ९ सप्टेंबर २०१६, ३१ जानेवारी २०१९ आणि १५ डिसेंबर २०२० च्या शासन परिपत्रक व प्रादेशिक उपसंचालक नगरपालिका प्रशासन विभाग नागपूर यांचे २९ जानेवारी २०२१ च्या पत्रांना मूल नगरपालिकेने केराची टोपली दाखवली असल्याचा आरोप सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला असून तत्काळ अंशदान, उपदान व रजा रोखीची रक्कम तत्काळ मिळावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आपली व्यथा त्यांच्याकडे मांडली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष बापू इदगुरवार, कार्याध्यक्ष महादेव पोनलवार, सचिव रमेश रणदिवे, कार्याध्यक्ष बबन सोयाम व इतर कर्मचारी उपस्थित होते.
बॉक्स
अनुदानासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू : तुषार शिंदे
मूल नगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अंशदान, उपदान व रजा रोखी संबंधाने शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे, शासनाकडून अनुदान प्राप्त होताच कर्मचाऱ्यांना वाटप केल्या जाईल, अशी प्रतिक्रिया मूल नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी तुषार शिंदे यांनी लोकमतशी बोलताना दिली.