सेवानिवृत्त शिक्षकाने स्वीकारले १७ मुलांचे पालकत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 05:00 AM2020-06-21T05:00:00+5:302020-06-21T05:00:56+5:30
पूनमचंद मोतीलाल चव्हाण असे या कनवाळू बापाचे नाव आहे. महावीर हिंदी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, मास्तरी येथून सन २००८ मध्ये ते शिक्षकी पेशातून सेवानिवृत्त झाले. पत्नी मरण पावली तर मोठा मुलगा अपघातात ठार झाला. दु:खाचा डोंगर कोसळल्यानंतर त्यांची बायपास सर्जरी झाली. लकव्याचे दुखणेही मागे लागले. परंतु त्यांनी याही पश्चात हार मानली नाही. रुग्णवाहिका घेवून रुग्णांना मोफत सेवा देऊ लागले.
प्रवीण खिरटकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : सेवानिवृत्त झाल्यानंतर रुग्णवाहिकेत नि:शुल्क सेवा रुग्णांना देणे सुरू केले. त्यानंतर ग्रामीण भागात मोफत औषधी वाटप केल्या. परंतु शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर अंगातील शिक्षक गेला नाही. त्यामुळे ११ वर्षांपासून गरीब मुलांना सोबत घेवून त्यांचे पालकत्त्व स्वीकारीत पेंशनमधून त्या मुलांचे शिक्षण, भोजन व राहण्याची व्यवस्था करीत तो १७ मुलांचा बाप झाला आहे.
पूनमचंद मोतीलाल चव्हाण असे या कनवाळू बापाचे नाव आहे. महावीर हिंदी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, मास्तरी येथून सन २००८ मध्ये ते शिक्षकी पेशातून सेवानिवृत्त झाले. पत्नी मरण पावली तर मोठा मुलगा अपघातात ठार झाला. दु:खाचा डोंगर कोसळल्यानंतर त्यांची बायपास सर्जरी झाली. लकव्याचे दुखणेही मागे लागले. परंतु त्यांनी याही पश्चात हार मानली नाही. रुग्णवाहिका घेवून रुग्णांना मोफत सेवा देऊ लागले. प्रत्येक महिन्याच्या १६ तारखेला यवतमाळ जिल्ह्यातील भांडेकडा येथे स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांना सोबत घेवून मोफत औषधीचे वाटप करू लागले. ग्रामीण भागात फिरत असताना गरीबी व पालकांच्या व्यवसनाधिनतेमुळे मुले शिक्षण घेवू शकत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. सुरुवातीला पूनमचंद हे तीन मुलींना घेवून आले. यात दोन मुली एचआयव्ही बाधित होत्या. त्यांच्यावर स्वत: चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार करून घेतल्यानंतर त्या आजारातून मुक्त झाल्या. घरी पत्नी नाही. मुली मोठ्या होत आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या पालकांकडे सुपूर्द केले. सन २००९ पासून वरोरा शहरातील बावणे लेआऊटमधील स्वत:च्या घरात बाल संस्कार केंद्र सुरू केले. इयत्ता ४ ते १२ वीपर्यंतचे १७ मुले शिक्षण घेत आहे. एक मुलगा आयटीआय करीत आहे. एकाने आयटीआय केल्यानंतर त्याला राजुरा येथे इलेक्ट्रीक दुकान टाकण्याकरिता पूनमचंद चव्हाण यांनी मदत केली. शुल्क, भोजन व निवासाची व्यवस्था ते करीत आहे.
मी व सर्व मुले पहाटे ४ वाजता उठतात. योगासने, धावणे, व्यायाम झाल्यानंतर मुले शाळेत जातात. मुलांची शिकवणी, त्यांच्यासोबत राहाणे व भोजन करणे हा नित्यक्रम बनला आहे. मुलांच्या प्रकृतीची काळजी वरोरा शहरातील डॉ. विवेक तेला, डॉ. पाटील, डॉ. डोंगरे घेत असून मुलांची तपासणी व औषधी ते मोफत देतात.
-पूनमचंद चव्हाण.
आईच्या मृत्युनंतर त्यांना एकटे वाटत होते. निवृत्तीनंतर घरात राहून बाजारात जाणे आणि नातवे सांभाळण्यापेक्षा ते गरीब मुलांवर संस्कार करीत असून त्यांना शिक्षण देत आहेत. ते आपल्या पेंशनमधून गरीब मुलांवर खर्च करीत असल्याने त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो. ते एक चांगले काम करीत आहे. याचा मला गर्व आहे.
- मनोज चव्हाण
रक्ताचे नाते असलेल्या मुलांचा सांभाळ प्रत्येक जण आपापल्या परीने करीत असतो; पण ज्यांना रक्ताच्या नात्यातील कोणीच नाही वा नात्यातील कोणी सांभाळ करीत नाही, अशा मुलांचे काय? या मुलांना आपले समजून अख्खे जीवन त्यांच्याचसाठी घालविणारा ‘बाप माणूस’देखील आपल्यांमध्येच असतो. अशा बाप माणसाला ‘फादर्स डे’निमित्त ‘लोकमत’चा सलाम !