सेवानिवृत्त शिक्षक, अंगणवाडीसेविकांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 11:57 PM2017-12-04T23:57:02+5:302017-12-04T23:57:23+5:30
चंद्रपूर जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाच्या ठरावानुसार सेवानिवृत्त शिक्षकांची प्रलंबित निवडश्रेणी, वरिष्ठश्रेणी, सुधारीत निवृत्तीवेतन, पाचव्या वेतन आयोगानुसार पडताळणी, सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी या मागण्या अनेक वर्षांपासून सुटलेल्या नाहीत.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाच्या ठरावानुसार सेवानिवृत्त शिक्षकांची प्रलंबित निवडश्रेणी, वरिष्ठश्रेणी, सुधारीत निवृत्तीवेतन, पाचव्या वेतन आयोगानुसार पडताळणी, सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी या मागण्या अनेक वर्षांपासून सुटलेल्या नाहीत. या सर्व मागण्या लवकरात लवकर सोडवाव्या, या मागणीकरिता सोमवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
प्रलंबित मागण्यांसाठी संघटना सतत पाठपुरावा करीत आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या वेळकाढू धोरणामुळे मागण्या प्रलंबित आहेत. संबधित अधिकारी याकडे लक्ष देत नाहीत. या समस्या निकाली काढून घेण्याकरिता मागील वर्षी १५ नोव्हेंबरला धरणे आंदोलन करण्यात आले होते. मात्र तरीही मागण्या सुटलेल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ४ डिसेंबरपासून धरणे आंदोलनाला सुरूवात करण्यात आली.
आज जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले, तर ५ डिसेंबरला भद्रावती, ६ ला सिंदेवाही, ७ ला मूल, ८ ला चंद्रपूर, ११ ला ब्रह्मपुरी, १२ ला नागभीड, १३ ला चिमूर, १४ ला वरोरा, १५ ला गोंडपिंपरी व पोंभुर्णा, १६ ला सावली, १८ ला कोरपना, बल्लारपूर व राजुरा येथे तालुका सेवानिवृत्त शिक्षक संघातर्फे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तर २० डिसेंबरला पुन्हा याच पद्धतीने आंदोलने करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या आंदोलनामध्ये संघटनेचे अध्यक्ष एस. एल. बोडणे, उपाध्यक्ष पु. रा. ठेेंगणे, एम. के. जगताप, म. ल. डाहुले, रजनी भडके, एन. बी. दासरवार, ना. तु. लांजेवार, उरकुडे, मडावी, राजूरकर, कन्नमवार, पातळे, रोहणी राऊत, छबू झाडे, रत्नमाला काकडे यांच्यासह जिल्हा संघटना व तालुका संघटनेचे बहुसंख्य पदाधिकारी सहभागी झाले होते. मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाºयांना देण्यात आले.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : अंगणवाडी सेविकांचे पाच महिन्यांचे थकीत मानधन तत्काळ द्यावे, सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका मदतनिसांना सेवानिवृत्तीचा लाभ द्यावा, घोषित केल्यानुसार दिवाळीभेट दोन हजार रुपये देण्यात यावी, अशा मागण्यांना घेवून सीटूच्या नेतृत्वात अंगणवाडी सेविकांनी सोमवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनात बहुसंख्य अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.
धरणे आंदोलनात सहभागी महिलांना मार्गदर्शन करताना अंगणवाडी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष शोभा बोगावार म्हणाल्या, बºयाच अंगणवाडी सेविकांना पाच महिन्यांपासून मानधन देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. थकीत मानधन तत्काळ यावे, अशी मागणी त्यांनी केली. संघटनेचे राज्याध्यक्ष प्रा. दहीवडे यांनी, अंगणवाडी महिलांच्या मागण्यांना घेवून सप्टेंबर महिन्यात राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविकांनी संप केला होता. त्यावेळी दिवाळीभेट एक हजार रुपये वाढवून दोन हजार रुपये करण्यात येईल, असे शासनातर्फे घोषित करण्यात आले होते. मात्र दिवाळीभेट देण्याबाबत एक हजार रुपयाचाच शासन निर्णय काढण्यात आला. ही अंगणवाडी सेविकांची शुद्ध फसवणूक आहे. घोषित केल्यानुसार दिवाळीभेट दोन हजार रुपये देण्यात यावी. तसेच सेवानिवृत्तीचा लाभ तत्काळ देण्यात यावा, अशी मागणी केली. त्यानंतर शिष्टमंडळाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे यांना निवेदन दिले. यावेळी रेखा रामटेके, वाघमारे, ललिता चौधरी, सुशिला कर्णेवार, शोभा कासर्लेवार, इंदिरा चनकापूरे, गुजाबाई डोंगे, वर्षा तिजारे, संध्या खनके आदी उपस्थित होते.