वेतनासाठी निवृत्त शिक्षकाची मनपाकडून १० वर्षांपासून फरफट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:20 AM2021-07-16T04:20:18+5:302021-07-16T04:20:18+5:30
चंद्रपूर : मनपा शिक्षण विभागातून १ जानेवारी २००६ ते २६ पेब्रुवारी २००९ पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचे अंशराशीकरण चुकीच्या पद्धतीने ...
चंद्रपूर : मनपा शिक्षण विभागातून १ जानेवारी २००६ ते २६ पेब्रुवारी २००९ पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचे अंशराशीकरण चुकीच्या पद्धतीने केले. त्यामुळे निवृत्ती वेतनातील रक्कम कमी झाली. मात्र, पडताळणी करून कापलेली रक्कम अजून दिली नाही. याबाबत १० वर्षांपासून पाठपुरावा करूनही मनपा माझी आर्थिक फरफट करीत आहे, असा आरोप घुटकाडा वॉर्डातील निवृत्त शिक्षक दादाजी महादेव देहारकर यांनी केला आहे.
निवेदनानुसार, चंद्रपूर मनपा शाळेतून ३० जून २००६ रोजी शिक्षक पदावरून निवृत्त झाले. त्यावेळी मूळ पेंशन ५ हजार ३९३ रुपये होते. ऑक्टोबर २००७ मध्ये अंशराशीकरणाची रक्कम असूधारीत निवृत्ती वेतनावर २ लाख २५ हजार ५५९ रुपये मिळाले. त्या महिन्यापासून पेंशनमधून दरमहा १ हजार ७९७ रुपये कपात सुरू झाली. त्याचेही अंशराशीकरण करायचे नाही. त्यानंतर सहावा वेतन आयोग लागू झाला. माझे मूळ पेंशन ८ हजार ८९५ रुपये झाले. शासन निर्णयानुसार जे कर्मचारी १ जानेवारी २००६ ते २६ फेब्रुवारी २००९ पर्यंत सेवानिवृत्त झाले. त्यांना सुधारीत वाढीव मूळ निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण करायचे असल्यास दोन पर्याय दिले होते. त्यापैकी एका पर्यायाचा विकल्प भरून द्यावा, असे शासन निर्णयात नमूद असल्याचे दादाजी देहारकर यांचे म्हणणे आहे.
मनपाने दिली नाही विकल्पाची सूचना
मनपाने १ जानेवारी २००६ ते २६ फेब्रुवारी २००९ पर्यंत निवृत्त कर्मचाऱ्यांना विकल्प भरून देण्याबाबत लेखी किंवा तोंडी सूचना दिली नाही. सुधारित मूळ निवृत्ती वेतनावर ४० टक्क्यांप्रमाणे अंशराशीकरण केले. वास्तविक जे कर्मचारी २७ फेब्रुवारी २००९ नंतर निवृत्त झाले त्यांचे सुधारीत अंशराशीकरण ४० टक्क्यांप्रमाणे करावयाचे आहे. जे कर्मचारी १ जानेवारी २००६ ते २६ फेब्रुवारी २००९ मध्ये निवृत्त झाले त्यांना सुधारीत मूळ निवृत्ती वेतनवजा असुधारीत मूळ निवृत्ती वेतनाच्या फरकाच्या १/३ रकमेचे अंशराशीकरण करावे लागते, असेही त्या शासन निर्णयात नमूद असल्याचा दावा दादाजी देहारकर यांनी केला आहे.
तक्रारींना केराची टोपली
अंशाराशीकरणाबाबत मी विकल्प भरला नसल्याने शासन निर्णयातील परिच्छेद ८.२ अ प्रमाणे अंशराशीकरण केल्याचे पत्र दिले. याबाबत मनपा आयुक्त व लेखाधिकाऱ्यांना भेटून अन्याय दूर करण्याची निवेदने दिली. निवृत्ती वेतनाबाबत झालेला अन्याय दूर करून कमी केलेली रक्कम देण्याची मागणी केली. मात्र, मनपाने तक्रारींना केराची टोपली दाखविली. माझ्यासारखेच अन्य निवृत्त शिक्षक म्हातारपणामुळे व्याधीग्रस्त असून काहींना कर्करोग तर काहींची बायपास सर्जरी व अर्धांगवायूने हतबल आहेत. मनपाने संबंधित प्रकरणाची पडताळणी करून तातडीने रक्कम द्यावी, अशी मागणी निवृत्त शिक्षक देहारकर यांनी केली आहे.