महाकालीचे दर्शन घेऊन भक्त निघाले परतीच्या प्रवासाला

By admin | Published: April 5, 2015 01:35 AM2015-04-05T01:35:22+5:302015-04-05T01:35:22+5:30

जिल्ह्याचे आराध्यदैवत असलेल्या देवी महाकालीच्या दर्शनासाठी आतापर्यंत लाखो भाविक चंद्रपुरात दाखल झाले.

On return journey, the devotee visited Mahakali | महाकालीचे दर्शन घेऊन भक्त निघाले परतीच्या प्रवासाला

महाकालीचे दर्शन घेऊन भक्त निघाले परतीच्या प्रवासाला

Next

चंद्रपूर : जिल्ह्याचे आराध्यदैवत असलेल्या देवी महाकालीच्या दर्शनासाठी आतापर्यंत लाखो भाविक चंद्रपुरात दाखल झाले. २५ मार्चपासून भाविकांचा जत्था चंद्रपुरात येत आहे. आज शनिवारी चैत्र शुध्द पोर्णिमा असली तरी चंद्रग्रहण होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविकांनी शुक्रवारीच माता महाकालीचे दर्शन घेऊन पूजा-अर्चणा केली. शनिवारी मंदिर व्यवस्थाने चंद्रग्रहण असल्याने मुखदर्शनाची व्यवस्था केली होती. भाविकांनी मातेचे दर्शन घेऊन रात्रीच परतीच्या प्रवासाला प्रारंभ केला.
जिल्ह्याचे आराध्यदैवत देवी महाकाली आहे. एप्रिल महिन्यात दरवर्षी मोठी यात्रा येथे भरते. यात्रा कालावधीत देवीचे दर्शन घेण्यासाठी नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, कोल्हापूर आणि आंध्रप्रदेशातील भाविष मोठ्या संख्येने येतात. येथील ऐतिहासिक जटपुरा गेट, अंचलेश्वर गेट येथे नारळ फोडून देवी महाकालीच्या नामाचा गरज करीत भाविक मंदिराकडे रवाना होताना दिसले. दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत चालली होती. शुक्रवारी ही गर्दी आणखी वाढली होती. त्यामुळे दर्शनासाठी वेळ लागत होता. शहरातील सेवाभावी संस्थांनी पाणी, जेवण, प्रसादाची व्यवस्था केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पोतराजांचे आगमन झाले असून ते आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. झरपट नदीवर अंघोळीची व्यवस्था करण्यात आली आहे. काल हजारो भाविकांनी पवित्र स्नान घेतले.
महाकाली यात्रेत चैत्र पोर्णिमा दिवस मुख्य असतो. या दिवशी दर्शन घेता यावे, यासाठी मिळेल त्या साधनाने भाविक शहरात दाखल होत असतात. पोर्णिमेच्या दिवशी लाखांवर भाविक रांगेत उभे राहून देवीचे दर्शन घेतात. भाविकांना दर्शन सुलभ होण्याच्या दृष्टीने मंदिराचे दार २४ तास उघडे असते. देवीच्या मूर्तीला स्पर्श करून भाविक स्वत:ला धन्य मानतात. यावर्षी शनिवार हा मुख्य दिवस होता. मात्र आज चंद्रग्रहण होते. त्यामुळे महाकाली मातेचे भाविकांना प्रत्यक्ष स्पर्शदर्शन मिळाले नाही. बहुतांश भाविकांना आज गाभाऱ्यातून केवळ मुखदर्शनच घेता आले. तशी व्यवस्था केली होती. (शहर प्रतिनिधी)

Web Title: On return journey, the devotee visited Mahakali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.