महसूल प्रशासनाने वसूल केला रेती तस्करांकडून एक कोटींचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 05:00 AM2020-07-02T05:00:00+5:302020-07-02T05:00:40+5:30
रेतीची वाहतूक तसेच खनन करण्यावर बंदी आहे. मात्र काही जण लपून वाहतूक करीत आहे. यांच्यावर कारवाई करण्यासाठी महसूल प्रशासनाने पथकाचे गठण केले आहे. पथकाद्वारे कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, बुधवारी काही रेती तस्करांनी पथकावर हल्ला केला. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. -निलेश गौंड, तहसीलदार, चंद्रपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात रेतीची वाहतूक तसेच खनन करण्यावर निर्बंध असतानाही तस्कर रेती तस्करीकरून शासनाचा महसूल बुडवित आहे. दरम्यान, चंद्रपूर तहसील कार्यालयाच्या पथकाने मागील वर्षभरात विविध शंभरावर कारवाई करून तस्करांकडून तब्बल १ कोटी १७ हजार १५५ रुपयांचा दंड वसुल केला आहे. विशेष म्हणजे, विविध पाच घटनांमध्ये पोलिसात गुन्हेही दाखल करण्यात आले असून काही प्रकरणात न्यायालयात दोषारोपपत्रही दाखल करण्यात आले आहे.
रेती तस्करांना कायद्याचा धाक नसल्याचा प्रकार पुन्हा घडला आहे. बुधवारी जमनजट्टी परिसरात नायब तहसीलदार राजू धांडे यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे आता पूर्णपणे या तस्करांच्या मुसक्या आवळणे प्रशासनाला गरजेचे आहे.
असे आहे प्रकरण
चंद्रपूर तहसील कार्यालयाने २०१९-२० मध्ये ८७ प्रकरणी कारवाई केली. यातून ८० लाख २६ हजार ९५५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर २०२०-२१ मध्ये २३ प्रकरणामध्ये १९ लाख ९० हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
रेतीची वाहतूक तसेच खनन करण्यावर बंदी आहे. मात्र काही जण लपून वाहतूक करीत आहे. यांच्यावर कारवाई करण्यासाठी महसूल प्रशासनाने पथकाचे गठण केले आहे. पथकाद्वारे कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, बुधवारी काही रेती तस्करांनी पथकावर हल्ला केला. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.
-निलेश गौंड, तहसीलदार, चंद्रपूर
यापूर्वी गुन्हे दाखल झालेल्या घटना
रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करीत असताना शासकीय कामात बळजबरी तसेच अडथळा निर्माण करणारे चंद्रपूर येथील संदीप रॉय याच्यावर ६ नोव्हेंबर २०१९ रोजी रामनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी अटक करून वाहन जप्त केले.
गौण खनिजाची चोरी व अवैध वाहतूक प्रकरणी जप्त केलेले वाहन शासकीय कार्यालय परिसरातून परस्पर पसार केल्याप्रकरणी पडोली येथील प्रल्हाद कामडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणीत आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे.
गौण खनिजाची वाहतूक करताना जप्त केलेले वाहन चंद्रपूर तहसील कार्यालयात जमा न करता परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी पडोली येथील अमीत गावंडे याच्यावर १९ डिसेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला.
रेती तस्करी प्रकरणी पथकाने वाहनाचा पाठलाग करून वाहन थांबविले असता महसूल अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी प्रल्हाद कामडी यांच्यावर रामनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे.
पथकाद्वारे जप्त केलेल्या रेतीचा लिलाव करण्यात आला आहे. २०२०-२१ मध्ये रेतीचे पाच लिलाव करण्यात आले. या माध्यमातून प्रशासनाने २१ लाख २७ हजार ४०० रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे.
जप्त केलेल्या वाहनांची दंडाची रक्कम मोठी असते.त्यामुळे काहीवाहन मालक वाहन सोडविण्याच्या भानदगडीतसुद्धा पडत नसल्याचे समजते.