दोन वर्षात ५.६० कोटींचा महसूल जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:36 AM2019-03-15T00:36:50+5:302019-03-15T00:37:22+5:30
येथील तहसीलदार होळी यांनी अवैध रेती व इतर गौणखनिज वाहतुकीवर आळा घालण्यासाठी विशेष पथकासह कारवाई करीत जानेवारी महिन्यापर्यंत तब्बल ५ कोटी ६० लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात सुमारे ९६ अवैध गौणखनिज वाहतूक प्रकरणात वाहनांवर कारवाई केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : येथील तहसीलदार होळी यांनी अवैध रेती व इतर गौणखनिज वाहतुकीवर आळा घालण्यासाठी विशेष पथकासह कारवाई करीत जानेवारी महिन्यापर्यंत तब्बल ५ कोटी ६० लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात सुमारे ९६ अवैध गौणखनिज वाहतूक प्रकरणात वाहनांवर कारवाई केली आहे.
मागील काही महिन्यांपासून रेती घाटाचे लिलाव रखडले आहे. त्यापूर्वीपासून राजुरा तालुक्यात नदी व नाल्यांमधून रेती चोरी इतरही गौण खनिज चोरीचे प्रकार सर्रास घडत होते. त्यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडविला जात होता. दरम्यान, राजुराच्या तहसीलदारांनी अवैध रेती व इतर गौण खनिजाच्या चोरीवर आळा घालण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक केली. ही पथके रात्रदिवस नदी, नाले व खाणींच्या परिसरात नजर ठेवून असतात. भरारी पथकाद्वारे अवैध गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात असून, तपासणी अंती वाहतूक परवाना बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतरच वाहन सोडले जाते.
मागील चार ते पाच महिन्यांपूर्वी रेतीघाटांच्या लिलावाची मुदत संपली होती. त्यानंतरही काही वाहतूकदारांकडून रात्रीच्या सुमारास चोरीच्या मार्गाने रेती आणली जात असताना तहसील कार्यालयाच्या पथकाने अशा अनेक वाहनांवर दंड ठोठावून कारवाई केली आहे.
सध्या जिल्ह्यातील रेतीघाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरु झाली असली तरी सर्वच घाटांचा लिलाव अजूनही झालेला नाही. त्यामुळे काही तस्कर नदी व नाल्यांमधील रेतीची तस्करी करीत आहेत. परंतु, राजुरा तालुक्यात सुरु असलेल्या धडक कारवाईमुळे त्यांच्यावर वचक बसला आहे.
विरुर स्टेशन परिसरात सर्वात जास्त कारवाया
राजुरा तालुक्यातील विरुर (स्टे) या भागातून चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक केली जात असल्याने तहसीलदार होळी व त्यांनी गठित केलेल्या पथकाकडून या भागाकडे विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. विरुर स्टेशन हा परिसर महाराष्ट्र - तेलंगणाच्या सीमेलगत असल्याने व या परिसरात नदी-नाले असल्याने मोठ्या प्रमाणात गौणखनिज या भागात आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वात जास्त कारवाया या भागातच करण्यात आल्या आहे. महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाईचे सत्र सुरु केल्यामुळेच रेती व इतर गौणखनिजाच्या वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे.