ब्रह्मपुरी तालुक्यातील पूर परिस्थितीबाबत पालकमंत्र्यांकडून आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2020 10:47 AM2020-09-02T10:47:12+5:302020-09-02T10:48:58+5:30
ब्रह्मपुरी तालुक्यातील पूरग्रस्त भागातील गावांना पाच कोटी रुपयांची तात्काळ मदत देण्यासोबतच प्रत्येकी पूरग्रस्त कुटुंबाला 10 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ब्रह्मपुरी तालुक्यातील पूरग्रस्त भागातील गावांना पाच कोटी रुपयांची तात्काळ मदत देण्यासोबतच प्रत्येकी पूरग्रस्त कुटुंबाला 10 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. शासकीय विश्रामगृह ब्रह्मपुरी येथे पार पडलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमुरकर, नगर परिषदेचे गटनेते विलास निखार, नगरसेवक नितीन ऊराडे, महेश भरे, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार विजय पवार, पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, उपविभागीय अभियंता बांधकाम श्री.कुचनकर तसेच खेमराज तिडके, नानाजी तुपर प्रामुख्याने उपस्थित होते.
तालुक्यात आलेली पूर परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला व योग्य त्या दक्षता घेण्याच्या सूचना दिल्यात. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, प्रशासन आपल्या सोबत आहे. पूर परिस्थितीमध्ये आपणास सहकार्य करण्यासाठी प्रशासन सदैव तत्पर आहे अशी हमी त्यांनी यावेळी दिली.