आढावा सभा पाणी पुरवठा विभागावर घसरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2016 01:10 AM2016-06-01T01:10:52+5:302016-06-01T01:10:52+5:30
खासदार अशोक नेते आणि आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी येथे सोमवारी घेतलेली आढावा सभा पाणी पुरवठा विभागावर चांगलीच घसरली.
१५ दिवसांत काम पूर्ण करणार
नागभीड: खासदार अशोक नेते आणि आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी येथे सोमवारी घेतलेली आढावा सभा पाणी पुरवठा विभागावर चांगलीच घसरली. अन्य विषयांवरसुद्धा गरमागरम चर्चा झाली. या आढावा सभेत १५ दिवसांत काम मार्गी लावण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. पण ते खरोखरच शब्दाला किती जागतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
या सभेला जिल्हा परिषदेचे अर्थ सभापती ईश्वर मेश्राम, उपविभागीय अधिकारी उमेश काळे, नागभीडचे तहसीलदार समीर माने यांची व्यासपिठावर प्रामुख्याने उपस्थिती होती. या आढावा सभेत जवळपास सर्वच विभागाच्या कामांवर चर्चा करण्यात आली. नागभीड तालुका शेतकऱ्यांचा असुनही विहीरींसाठी केवळ १८६ अर्ज आलेत, अशी माहिती देण्यात आल्यानंतर यावर आश्चर्य व्यक्त करण्यात आले. या योजनेत जास्तीत जास्त शेतकरी सहभागी कसे होतील, यासाठी जनजागरण करण्यात यावे, अश्या सूचना यावेळी देण्यात आल्या. यानंतर पाणी पुरवठा विभागाचा प्रश्न चर्चेत आला. पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी सोमकुंवर यांची यावेळी चांगलीच तारांबळ उडाली. वाढोणा, तेलीमेंढा, मोहाळी (मोकासा) व पाहार्णी येथील पाणी पुरवठा योजनांंनी या आढावा सभेत चांगलाच भाव खाल्ला. वाढोणा येथे पाणी पुरवठा योजना कार्यरत असूनही केवळ अधिकाऱ्यांच्या वेळकाढू धोरणामुळे वाढोणावासियांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. मोहाळी येथील पाणी पुरवठा योजनेची एमबी गेल्या एक वर्षांपासून गायब आहे. तरीही अधिकारी साखर झोपेत आहेत. यावरून आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी चांगलेच धारेवर धरले. यावर वाढोण्याचे काम १५ दिवसांत पूर्ण केले जाईल. तसेच मोहाळीच्या एमबी त्वरित पूर्ण केल्या जाईल, असे यावेळी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. नागभीड तालुक्यात बहुतेक योजना अपूर्ण आहेत. मोघम उत्तरे देऊ नका, अशी कान उघाडणीही खा. नेते यांच्याकडून यावेळी करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)