स्वच्छतेचा प्रधान सचिवांकडून आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 11:43 PM2018-01-20T23:43:12+5:302018-01-20T23:43:55+5:30
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत बल्लारपूर नगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण २०१८ उपक्रम राबवित आहे.
आॅनलाईन लोकमत
बल्लारपूर : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत बल्लारपूर नगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण २०१८ उपक्रम राबवित आहे. या कामाचा आढावा राज्य सरकारच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी घेतला. नागरी भागात स्वच्छता सर्व्हेक्षणातील कामाला प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी नगर प्रशासनाला दिले. दरम्यान, त्यांनी ओला व सुका कचरा वेगळा करून खत निर्मिती प्रकल्पाचे निरीक्षण केले.
बल्लारपूर नगरपालिका प्रशासनाने शहराला शौचालय मुक्त करण्याच्या संकल्पनेला प्रत्यक्षात साकारण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागृती केली. स्वच्छ व सुंदर, हिरवेगार, प्रदूषण मुक्त शहराचा ध्यान घेतला. शहरात स्वच्छतेची लोकचळवळ निर्माण करण्याचा निर्धार केला. काही प्रमाणात यात यश आले. मात्र अद्यापही स्वच्छतेचा मोठा पल्ला गाठायचा आहे. स्वच्छतेच्या संदर्भातील जागृती नागरिकांनी मनावर घेतली नाही. स्वच्छता सर्वेक्षणात शहराला अव्वल स्थानावर आणण्यासाठी प्रशासनाने प्राधान्य देवून उर्वरित कामाला गती देण्याचे निर्देश म्हैसकर यांनी नगरपालिका प्रशानाला दिले.
यावेळी राज्य शासनाचे उपसचिव सुधाकर बोबडे, नागपूर विभागाचे प्रादेशिक उपसंचालक सुधीर शंभरकर, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिश शर्मा, मुख्याधिकारी विपीन मुद्धा, नगरसेवक येलय्या दासरफ, कमलेश शुक्ला, आशा संगीडवार, सारिका कनकम, स्वच्छतादूत विकास दुपारे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मुख्याधिकारी विपीन मुद्धा यांनी चलचित्राच्या माध्यमातून नगरपालिका राबवित असलेल्या खत प्रकल्प, बॉयोगॅस प्रकल्प, प्लास्टिकपासून डांबरी रस्ते, भूमिगत नाली, प्लास्टिकपासून ट्रीगार्ड, ऐतिहासिक किल्ला परिसरातील स्वच्छता व सौंदर्यीकरण, घनकचरा प्रकल्पाचे सादरीकरण करून प्रधानसचिव म्हैस्कर यांना माहिती दिली. नगरपालिकेतर्फे शहरातील प्लास्टिक पिशव्यावर प्रतिबंध लावून चांगले काम केले. पर्यावरण पूरक साहित्य वापरण्याचे शहरातील व्यापाºयांना सांगण्यात आले. त्याचा मोठा फायदा झाल्याचे सिद्ध झाले.