क्रांतीनगरीत सर्वसोयीयुक्त रुग्णालय

By Admin | Published: June 7, 2017 12:47 AM2017-06-07T00:47:19+5:302017-06-07T00:47:19+5:30

मानवाला सुखी जीवनाचा आनंद घेण्यासाठी त्याचे आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे. यासाठी शासनही अनेक आरोग्य सुविधा नागरिकांना पुरवित आहे.

Revolutionary Hospital | क्रांतीनगरीत सर्वसोयीयुक्त रुग्णालय

क्रांतीनगरीत सर्वसोयीयुक्त रुग्णालय

googlenewsNext

हेडगेवार सेवा समितीचा पुढाकार : भांगडिया परिवाराने दिली दोन एकर जागा
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : मानवाला सुखी जीवनाचा आनंद घेण्यासाठी त्याचे आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे. यासाठी शासनही अनेक आरोग्य सुविधा नागरिकांना पुरवित आहे. मात्र चिमूर तालुक्यात बऱ्याच आरोग्य सेवांचा अभाव आहे. समाजसेवेचा वसा घेतलेले स्वर्गीय गोदूलाल गोपालदास भांगडिया यांच्या प्रेरणेने आमदार मितेश भांगडिया व आ. कीर्तीकुमार भांगडिया यांच्या दातृत्वातून चिमूर तालुक्यातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळावी म्हणून अनेक वर्षांपासून प्रयत्न चालविले आहेत. या प्रयत्नाला हेडगेवार सेवा समितीची साथ लाभल्याने आता क्रांतीनगरीत सर्व सुविधायुक्त रुग्णालय उभे राहणार आहे.
चिमूर तालुक्यातील एक लाख ६७ हजार नागरिकांचा भार उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रावर होता. त्यातही या रुग्णालयात सुविधा उपलब्ध नसल्याने येथे फक्त प्रथमोपचार करण्यात येत आहे. तर मोठ्या उपचारासाठी नागरिकांना नागपूर, चंद्रपूर, सेवाग्राम, सावंगी या शहरात जावे लागते.
त्यामध्ये गरीब रुग्णांना आर्थिक परिस्थितीमुळे जाता येत नाही व यामध्ये अनेकांना उपचाराअभावी आपला जीव गमवावा लागला आहे.
भांगडिया परिवाराने अनेक वर्षांपासून सामाजिक बांधीलकी जोपासून गोरगरीबांना मदत केली आहे. मात्र याही पुढे जात आरोग्य सुविधा मिळावी म्हणून आमदार भांगडिया यांनी ‘डॉक्टर आपल्या दारी’ या उपक्रमातून अनेक रुग्णांच्या शस्त्रक्रिया करून जीवनदान दिले आहे. हे करण्यासाठीही रूग्णांना नागपूरसारख्या शहरातच रेफर करावे लागत होते. यापासून तालुक्यातील नागरिकांची सुटका व्हावी म्हणून चिमुरातच मोठे भव्यदिव्य रुग्णालय असावे, अशी भांगडिया परिवाराची इच्छा होती. याच सामाजिक जाणिवेतून आमदार भांगडिया पिता-पुत्रानी वरोरा-चिमूर मुख्य रोड लगत सोनेगाव (बे) येथील दोन एकर जागा हेडगेवार सेवा समिती चंद्रपूरला दान दिली आहे.
या दोन एकर परिसरात हेडगेवार सेवा समितीच्या मार्फतीने १०० बेडचे मोठे रुग्णालय बांधण्यात येणार असून या रुग्णलयात दुर्धर आजाराच्या शस्त्रक्रियासह अनेक सुविधा उपलब्ध करून देण्याचा मान आमदार भांगडिया यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केला. यामुळे रूग्णांचा त्रास दूर होण्यास मदत होणार आहे.

सोमवारी पार पडले जमिनीचे दानपत्र
५ जून सोमवारला दुय्यम निबंधक कार्यालयात दोन एकर जागेचे दानपत्र हेडगेवार सेवा समितीला करून देण्यात आले. या प्रक्रियेसाठी हेडगेवार सेवा समितीचे डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार, आ. कीर्तीकुमार भांगडिया, डॉ.दिलीप शिवरकर, उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक, उपसरपंच कलीम शेख आदींच्या उपस्थितीत दोन एकर जागेचे दानपत्र करून दिले. या जागेत १०० खाटांचे सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज रुग्णालय साकारण्यात येणार आहे. त्यामुळे चिमूर तालुक्यातील गोरगरीब जनतेला आता चिमुरातच सर्व आरोग्याच्या सुविधा मिळणार आहेत.

Web Title: Revolutionary Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.