राईस मिलमुळे विविध आजारांचा धोका

By Admin | Published: January 11, 2015 10:49 PM2015-01-11T22:49:14+5:302015-01-11T22:49:14+5:30

मूलनगर परिषदेअंतर्गत वॉर्ड क्रमांक ११ मध्ये भारत राईस मिल व दत्त राईस मिल आहे. दिवसरात्रं सदर राईस मिल सुरू असल्याने विविध आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Rice Mill Due to Disease Disease | राईस मिलमुळे विविध आजारांचा धोका

राईस मिलमुळे विविध आजारांचा धोका

googlenewsNext

मूल : मूलनगर परिषदेअंतर्गत वॉर्ड क्रमांक ११ मध्ये भारत राईस मिल व दत्त राईस मिल आहे. दिवसरात्रं सदर राईस मिल सुरू असल्याने विविध आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच दत्त राईस मिलची सध्या उंची वाढविण्याचे काम सुरू असल्याने परिसरातील नागरिकांना प्रदूषणाचा त्रास होणार आहे. त्यामुळे सदर दोन्ही राईस मिल शहराबाहेर हटविण्याची मागणी एका लेखी निवेदनाद्वारे न.प.च्या मुख्याधिकाऱ्यांकडे मुन्ना घुटके व इतर नागरिकांनी केली आहे.
मूल नगर परिषद मूल अंतर्गत वॉर्ड क्रमांक ११ मध्ये शहराच्या मध्यभागी भारत राईस मिल व दत्त राईस मिल या दोन राईस मिल आहेत. सदर दोन्ही राईस मिल रात्रंदिवस सुरू असतात. या राईस मिलमधून निघणारा कोंडा, बारीक भुसा, थेट स्वयंपाकगृहात जाऊन खाण्याच्या पदार्थात मिसळत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सतत दहा वेळा झाडलोट केल्यानंतरही बारीक भुसा ‘जैसे थे’ पडून असतो. त्यामुळे कोंडा, भुसा अंगावर पडून खाज सुटून विविध आजारांसह त्वचा रोग होण्याची शक्यता आहे.
पावसाळ्याच्या दिवसात राईस मिलमध्ये कोंडा साठवून ठेवले जात असल्याने पावसाने तो कुचतो व दुर्गंधी सुटते. त्यात डुकरे व इतर जनावरे रात्रोंदिवस बसत असल्याने वातावरण दुषित होते. त्यामुळे विविध आजाराची लागण होत असते. सडक्या कोंड्यामुळे कॉलरा, मलेरिया, फायलेरिया या सारख्या रोगाची लागण होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
सदर राईसमिल शहराच्या मध्यभागी असल्याने व दिवस रात्र सुरू असल्याने शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास करणे कठीण झाले आहे. विविध आजाराचे थैमान घालु पाहणाऱ्या सदर राईस मिल शहराबाहेर हटविण्याची मागणी न.प.ला करण्यात आली. कोंड्याच्या भुकटीमुळे होणाऱ्या आजाराबाबत वेळोवेळी निवेदन देण्यात आले. मात्र न.प. प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. एवढी गंभीर बाब असताना देखील न.प.ने दत्त राईस मिलच्या दुरुस्ती बांधकामाला परवानगी दिली आहे. यावरुन न.प. प्रशासनाला जनतेची चिंता नाही असे समजते. याबाबत निर्णय न घेतल्यास आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचा इशारा मुन्ना घुटके व इतर ९९ नागरिकांनी निवेदनातून दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Rice Mill Due to Disease Disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.