झेडपी शाळेतील रजिस्टरमध्ये जातीच्या रकान्यात खोडतोड; मुख्याध्यापकावर होणार निलंबनाची कारवाई
By साईनाथ कुचनकार | Published: May 6, 2024 07:27 PM2024-05-06T19:27:08+5:302024-05-06T19:27:31+5:30
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने प्रकरण आणले उघडकीस; मुख्याध्यापकावर होणार निलंबनाची कारवाई
चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील मांगलगाव जिल्हा परिषद शाळेत एका प्रकरणामध्ये खारिज रजिस्टरमध्ये जातीच्या रकान्यात खोडतोड असल्याचे प्रकरण जात पडताळणी समितीने उजेडात आणले आहे. माना ही जात खोडून महार करण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून संबंधितांवर काय कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. हे प्रकरण उजेडात येताच जिल्हा परिषद शिक्षण विभागाने तत्काळ पत्र काढून कोणत्याही मुख्याध्यापकांनी खारिज रजिस्टरमधील मूळ नोंदीमध्ये खोडतोड करू, नये अन्यथा निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ज्यावेळी मुलाला शाळेत दाखल केले जाते.
त्यावेळी शाळांमध्ये असलेल्या दाखल खारिज रजिस्टरमध्ये त्याची सर्व माहिती नोंदविली जाते. यामध्ये जातीच्या रकान्यात त्याची जी जात असेल तीसुद्धा नोंदविली जाते. भविष्यात जेव्हा केव्हा जात प्रमाणपत्र काढायचे असते. तेव्हा शाळेतील याच रजिस्टरवरील माहितीच्या आधारे पुरावा मानला जातो. मात्र मांगलगाव जिल्हा परिषद शाळेतील दाखल रजिस्टरमध्ये एका प्रकरणात खोडतोड करण्यात आली. चक्क माना जातीची महार करण्यात आले आहे. या प्रकरणी जात पडताळणी समितीला संशय आल्याने त्यांनी मूळ रजिस्टर घेऊन मुख्याध्यापकांना कार्यालयात बोलावले. तेव्हा हा सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला आहे. त्यानंतर जात पडताळणी समितीने जिल्हा परिषद प्रशासनाला यासंदर्भात कळविले असून संबंधित मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई होणे गरजेचे असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
मूळ अभिलेखाचे काळजीपूर्वक करावे जतन
या घटनेनंतर जिल्हा परिषद प्राथमिक विभागाने तत्काळ पत्र काढून शाळा प्रशासनाने मूळ अभिलेखामधील कोणत्याही प्रकारची खाडाखोड किंवा हेतुपुरस्पर नव्याने जातीचा समावेश करू नये. अभिलेखाचे काळजीपूर्वक जतन करावे. अशा सूचना दिल्या आहेत.
जिल्हा परिषदेने काढले पत्र
जात पडताळणी समितीने दाखल रजिस्टरमध्ये खोडतोड केल्याचे प्रकरण उघडकीस आणून दिल्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापकांना एक पत्र पाठविले आहे. यामध्ये कोणत्याही मुख्याध्यापकांनी अशी खोडतोड करू नये, अशी खोडतोड केल्यास संबंधित मुख्याध्यापकांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे पत्र काढले आहे.