भर पावसात बजावला मतदानाचा हक्क

By admin | Published: July 10, 2016 12:35 AM2016-07-10T00:35:45+5:302016-07-10T00:35:45+5:30

कोरपना तालुक्यातील २६ ग्रामपंचायत, राजुरा तालुक्यातील २४ ग्रामपंचायत तर जिवती तालुक्यातील २० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज शनिवारी मतदान पार पडले.

The Right to Vote | भर पावसात बजावला मतदानाचा हक्क

भर पावसात बजावला मतदानाचा हक्क

Next

ग्रामपंचायत निवडणूक : कोरपना-८२, राजुरा-७५ तर जिवती-६५ टक्के मतदान
चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील २६ ग्रामपंचायत, राजुरा तालुक्यातील २४ ग्रामपंचायत तर जिवती तालुक्यातील २० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज शनिवारी मतदान पार पडले. यात कोरपना तालुक्यात ८२ टक्के, राजुरा तालुक्यात ७५ टक्के तर जिवती तालुक्यात ६५ टक्के मतदान झाले. शनिवारी दिवसभर संततधार पाऊस असल्यामुळे मतदानाची टक्केवारी निम्म्यावर जाईल, असे वाटत होते. मात्र भर पावसातही नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला.
जिवती : जिवती तालुक्यात एकूण २० ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. एकूण ११७ जागेसाठी ४१३ उमेदवार रिंगणात होते. दिवसभर तालुक्यात पाऊस पडत असला तरी अधिकारी व कर्मचारी यांनी आपआपली जबाबदारी पार पडली. प्रारंभी सकाळी दोन-चार नागरिकच मतदान केंद्रावर जाताना दिसत होते. मात्र पाऊस उसंत घेणार नाही, हे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी घराबाहेर पडणे सुरू केले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत तालुक्यातील मतदान ४० टक्के होते. सायंकाळी अखेरपर्यंत ६५ टक्के मतदान झाले.
कोरपना : तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीकरिता मतदान पार पडले. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रशासनाने मतदानाची तयारी केली. चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. कोरपना तालुक्यात निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती पेसा कायद्यांतर्गत येतात. त्यामुळे या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी संघटना, भाजप व शिवसेनासह पक्षांनी या निवडणुकीत उडी घेतली आहे. बऱ्याच ठिकाणी पॅनल तयार करून निवडणुका लढविल्या जात आहे. या निवडणुकीत मतदार कुणाच्या पारड्यात मते टाकतात, हे निकालाअंतीच स्पष्ट होणार आहे. शनिवारी सर्वच ग्रामपंचायतीमध्ये शांततेत मतदान पार पडले. तालुक्यात २२२ जागाकरिता ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीत २९ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे.
राजुरा : राजुरा तालुक्यात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. राजुरा तालुक्यात एकूण २४ ग्रामपंचायतीसाठी ही निवडणूक घेण्यात येत आहे. दरम्यान, आज शनिवारी मतदानाच्या दिवशीच दिवसभर पाऊस असल्याने नागरिकांना छत्र्या, रेनकोट घालूनच मतदानासाठी जावे लागले. सकाळी काही प्रमाणात मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून आली. मात्र दुपारच्या सुमारास अचानक गर्दी कमी झाली. यामुळे मतदानाची टक्केवारी घसरणार, असे शासकीय यंत्रणेला वाटत होते. मात्र दुपारनंतर पुन्हा मतदार बाहेर पडताना दिसून आले. सायंकाळी अखेरपर्यंत तालुक्यात ७५ टक्के मतदान झाले. (लोकमत चमू)

नांदा येथे मशीनमध्ये बिघाड; काही काळ मतदान ठप्प
नांदा येथे मशिनमध्ये बिघाड असल्याने काही वेळ नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. परंतु बिघाड दुरुस्त झाल्यानंतर पुर्ववत मतदान सुरू झाले. सर्वात मोठी हीच नांदा ग्रामपंचायत निवडणूक असून या ठिकाणी सर्वच पक्षानी आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहे. तालुक्यातील परसोडा ग्रामपंचायत निवडणुकीवर मतदान करण्याकरिता गोविंदपुर येथील नागरिकांना येता आले नाही. परसोडा गावात जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावरुन पाणी असल्याने गोविंदपुर येथील नागरिक मतदानापासून वंचित राहले.यासोबतच अनेक भागात जोरदार पाऊस झाल्याने तेथील नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला नाही.

फिरत्या पोलीस पथकाची मतदारांसोबत हुजत
जिवती : जिवती तालुक्यातील २२ पैकी २० ग्रामपंचायतीची निवडणूक असून यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवाात आला. अगोदरच अतिसंवेदनशील असलेल्या या तालुक्यात व्यवस्थित मतदान व्हावे, यासाठी जिल्हाभरातील पोलीस बळ जिवतीत दाखल करण्यात आले. पण काही ठिकाणी पोलीसदादांकडून मतदारांसोबत हुजत घातल्याचे दिसून आले. नोकेवाडा ग्रा.पं.ची आज निवडणूक असून गावातील मतदार विष्णू खंडेकर हा जिवती येथे राहून पंचायत समितीची गाडी चालवितो. आज मतदान करण्यासाठी तो नोकेवाडा येथे आला असता फिरते पोलीस पथकातील एका पोलीस कर्मचाऱ्याने तु इथे कसा आला? तुझे इथे काय काम म्हणून हुज्जत घातली व मतदान करण्यास मज्जाव केला. या फिरत्या पोलीस पथकाने नोकेवाडा येथील मतदान केंद्रावर आपली गाडी थांबवून मतदारांवर दबाव टाकल्याचे गावकऱ्यांनी बोलून दाखविले.

Web Title: The Right to Vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.