बॅक वॉटरचा धोका कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 11:59 PM2019-05-09T23:59:13+5:302019-05-09T23:59:50+5:30
पावसाळ्यापूर्वी करायची कामे महापालिकेने हातात घेतली आहे. शहरातील कृत्रिम पूरपरिस्थिती टाळण्यासाठी महापालिकेने शहरातील मोठ्या नाल्यांची सफाई सुरू केली आहे. मात्र शहरात अनेक ठिकाणी या मोठ्या नाल्यांवर अतिक्रमण करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पावसाळ्यापूर्वी करायची कामे महापालिकेने हातात घेतली आहे. शहरातील कृत्रिम पूरपरिस्थिती टाळण्यासाठी महापालिकेने शहरातील मोठ्या नाल्यांची सफाई सुरू केली आहे. मात्र शहरात अनेक ठिकाणी या मोठ्या नाल्यांवर अतिक्रमण करण्यात आले आहे. पक्के बांधकाम झाले आहे. तेथील गाळ तसाच कायम आहे. त्यामुळे जोरदार पाऊस झालाच तर शहरात बॅक वॉटरमुळे धोका कायम आहे.
चंद्रपूर हे प्राचीन शहर आहे. या शहरात अनेक प्राचीन वास्तू तेव्हाच्या प्रगल्भ इतिहासाची साक्ष देत डोलाने उभ्या आहेत. यासोबतच शहरात पूर्वीपासून मोठे नालेही वाहतात. हे नाले शेवटी इरई नदीत विसर्जित होतात. पूर्वी या नाल्यांमध्ये शहरातील कचरा फेकला जात असायचा. त्यामुळे पावसाळ्यात थोडा जरी पाऊस झाला तरी बॅक वाटरमुळे शहरात पूरपरिस्थिती निर्माण व्हायची. आता महानगरपालिकेच्या वतीने घराघरातून कचरा संकलन करण्यात येत आहे. तरीही अनेक व्यावसायिक, हातठेलेधारक या नाल्यांमध्येच कचरा टाकतात. याशिवाय अनेक ठिकाणी शौचालयाची घाणही या नाल्यांमध्ये सोडली जाते. त्यामुळे अशा नाल्यांमध्ये गाळ साचणे सुरूच आहे.
संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी महानगरपालिकेने सध्या या मोठ्या नाल्यांची सफाई केली जात आहे. अनेक ठिकाणी सफाई कामगार स्वत:च हे काम करीत आहेत तर काही ठिकाणी जेसीबी लावण्यात आला आहे. जे नाले मोकळे आहेत, केवळ तेथील सफाईच केली जात आहे. मात्र चंद्रपुरातील बहुतांश ठिकाणी मोठ्या नाल्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. काही ठिकाणी तर पक्के बांधकाम करून हे नालेच गिळंकृत केले आहे. अशाच एका नाल्यावर तर शहरातील एक नामांकित मोठे महाविद्यालयच उभे आहे. अशा अतिक्रमणित नाल्याची सफाई मजुरांकरवी किंवा जेसीबीनेही होत नाही. यावर महानगरपालिकेला आजवर तोडगा काढता आला नाही. त्यामुळे येथील गाळ अनेक वर्षांपासून उपसला नाही. यंदाही अशा नाल्यांमधील गाळ तसाच आहे.
नाल्यांमध्ये प्लास्टिक बाटल्यांचा खच
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र अनेक दारू विक्रेते अवैध मार्गाने दारू आणून आंबट शौकिनांची हौस भागविता दिसतात. त्यानंतर दारूच्या रिकाम्या बॉटल्ससह पाण्याच्याही बॉटल्स नाल्यांमध्ये टाकून हे आंबटशौकीन पसार होतात. मनपाच्या नाले सफाई मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात अशा दारूच्या बॉटल्स मलब्यातून निघाल्या. या बाटलांचा असा खच नाल्यांमध्ये वाढत राहिला तर नाल्यातील पाणी अडले जाण्याची शक्यता आहे.