पावसाअभावी धानपिक धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 11:40 PM2017-09-02T23:40:12+5:302017-09-02T23:40:27+5:30
भिसी तसेच चिमूर तालुक्यात यावर्षीच्या हंगामात पुरेपूर पाऊस न पडल्यामुळे धानपिक धोक्यात आले आहे. बोडी तलाव पावसाळा संपण्याच्या मार्गावर आला तरी रिकामेच आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
भिसी : भिसी तसेच चिमूर तालुक्यात यावर्षीच्या हंगामात पुरेपूर पाऊस न पडल्यामुळे धानपिक धोक्यात आले आहे. बोडी तलाव पावसाळा संपण्याच्या मार्गावर आला तरी रिकामेच आहेत.
चिमूर तालुक्यातील महत्त्वाचे पिक धान (तांदूळ) असून यावर्षी तालुक्यातील ८०-९० गावातील धान रोवणी पावसाअभावी होऊ शकली नाही. त्यामुळे धानाची शेती पडलेल्या अवस्थेत आहेत. गेल्या ३०-३५ वर्षाच्या कालखंडात पहिल्यांदाच बोडी-तलाव रिकामे आहेत. एरवी पावसाळ्यात जुलै अखेरपर्यंत सर्व बोडी, तलाव पावसाने भरलेले असायचे. बाहेर पाणी वाहायचं, पण या पावसाळ्यातील परिस्थिती उलटी आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने शेतकºयांनी काही प्रमाणात रोवणी केली. परंतु धानाच्या रोवणीचा हंगाम संपल्यातच असल्याने धानपिक होणार की नाही ही शंकाच आहे.
१६ आॅगस्ट २०१७ ला चिमूरला क्रांतीदिनी मोठा कार्यक्रम झाला. स्वत: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चिमूरला आले. पण या कार्यक्रमात शेतकºयांच्या प्रश्नाबाबत कुणीच काही बोलले नाही. यावेळी शेतकरी दुर्लक्षित दिसून आला. आपल्या प्रास्ताविक भाषणातून सध्याच्या दुष्काळी परिस्थितीबद्दल धान समस्या, गोसीखुर्द पाणी समस्या व इतर बाबतीत लक्ष केंद्रीत करणे आवश्यक होते. परंतु धान समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. आज चिमूर तालुक्यातील शेतकºयांची परिस्थिती गंभीर आहे. तलाव-बोडीत पाणी नसल्याने पुढील पिक कसे घेणार, या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. यावर्षी नदीचा महापूर काय, पण साधा पूरही तालुक्यातील लोकांनी पाहिला नाही. नदी-नाले रिकामेच दिसतात. भविष्यात अशीच परिस्थिती राहिली तर पाण्याची भीषण टंचाई निर्माण होऊन पिण्यासाठी पाणी मिळणार नाही. महाराष्ट्राचे शासनही कर्जमाफीच्या नावाखाली शेतकºयांचे शोषण करताना दिसते. मदतीचा हात देण्याऐवजी शेतकºयांचे अश्रू पुसण्याऐवजी शेतकºयांच्या तोंडाला कोरडी पाने पुसण्याचा प्रकार सध्यातरी दिसून येत आहे. त्यामुळे चिमूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी तालुक्यातील सर्व गावातील शेतकºयांनी केली आहे.