संततधार पावसामुळे नदी-नाले तुडुंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 12:59 AM2019-08-08T00:59:51+5:302019-08-08T01:01:39+5:30
उशिरा आगमन झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असतानाच मागील काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले तुंडुंब भरले आहेत. दरम्यान, मागील पंधरा दिवसांपासून सूर्यनारायणाचे दर्शनच झाले नाही. परिणामी शेतपिकांवर विविध रोगांचा प्रादूर्भाव वाढला आहे. तर दुसरीकडे धान रोवणीच्या कामाला वेग आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : उशिरा आगमन झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असतानाच मागील काही दिवसांपासून कोसळणाºया पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले तुंडुंब भरले आहेत. दरम्यान, मागील पंधरा दिवसांपासून सूर्यनारायणाचे दर्शनच झाले नाही. परिणामी शेतपिकांवर विविध रोगांचा प्रादूर्भाव वाढला आहे. तर दुसरीकडे धान रोवणीच्या कामाला वेग आला आहे. बुधवारपर्यंत जिल्ह्यात ६६१.५५ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यात सिंदेवाही तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली.
यावर्षी जून महिन्यामध्ये पावसाने हूलकावणी दिल्याने कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट ओढवले. तर धान उत्पादक शेतकऱ्यांनाही रोवणीसाठी आवश्यक असलेला पाऊस वेळेत आला नसल्याने रोवण्या लांबणीवर गेल्या. दरम्यान, जूलै महिन्यामध्ये पुन्हा पावसाने मोठी विश्रांती घेतल्यामुळे अंकुरलेले पिके कोमेजली. त्यानंतर गावागावांत वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी पुजाअर्चनाही करण्यात आली. मात्र पावसाची विश्रांती दीर्घकालीन ठरल्याने अनेक शेतकऱ्यांचे शेतातील पिके करपली. दरम्यान, मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. सततच्या पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत आहे. बुधवारपर्यंत जिल्ह्यात ६६१.५५ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. मागील वर्षीय ७ आॅगस्टपर्यंत ७४७ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. दरम्यान पावसाची अशीच रिपरीप सुरुच राहिल्यास जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा
जिल्ह्यातील सावली, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, मूल, नागभीड, पोंभूर्णा आदी तालुक्यामध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांची मोठी संख्या आहे. यावर्षी पावसाने प्रथम हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र मागील पंधरा दिवसांपासून सतत सुरु असलेल्या पावसामुळे रोवणीसाठी आवश्यक असलेला पाऊस कोसळल्यामुळे आता रोवणीच्या कामाला वेग आला आहे. दोन पाळ्यांमध्ये रोवणीचे काम सध्या सुरु असून सकाळी ६ ते ११ आणि १० ते ५ वाजेपर्यंत रोवणी केली जात आहे. दरम्यान, मजुरीही काही प्रमाणात वाढली आहे.
नदी-नाल्यांना पूर
मागील काही दिवसांपासुन सुरु असलेल्या पावसामुळे नदी-नाले दुथळी भरून वाहत आहे. इरई धरणातील जलसाठा वाढल्यामुळे शनिवारी सातही दरवाज्यांतून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे नदीकाठावरील गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला.
कापूस, सोयाबीन पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव
प्रथम दीर्घ विश्रांती आणि त्यानंतर सतत कोसळणाऱ्या पावसामुळे कापूस, सोयाबीन, तूर पिकांवर विविध रोगांनी आक्रमण केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेने वातावरण आहे. सततच्या पावसामुळे शेतातील कामावरही परिणाम झाला आहे. ढगाळी वातावरणामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. दोन वर्षापूर्वी लष्कळी अळीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. यावर्षीसुद्धा पिकांवर प्रादूर्भाव होऊ शकेल, असेच वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतात जाऊन पिकांची पाहणी केली आहे. यावेळी त्यांना विविध रोगांची प्राथमिक लक्षणे आढळल्यामुळे शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. सोबतच विविध औषधांची फवारणी करण्याचे आवाहनही केले आहे.