नद्या, तलावांनी गाठला तळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 11:55 PM2019-05-12T23:55:32+5:302019-05-12T23:56:14+5:30
चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच मागील अनेक दिवसांपासून सूर्य आग ओकत आहे. सूर्याच्या या उग्र रुपामुळे पाण्याचा जलस्तर झपाट्याने कमी होत आहे. जिल्ह्यातील नदी, नाले, तलाव, बोड्या व आणखी जे जलसाठे असतील, त्यांनी तळ गाठला आहे. वर्धा, वैनगंगा या मोठ्या नद्याही आटत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच मागील अनेक दिवसांपासून सूर्य आग ओकत आहे. सूर्याच्या या उग्र रुपामुळे पाण्याचा जलस्तर झपाट्याने कमी होत आहे. जिल्ह्यातील नदी, नाले, तलाव, बोड्या व आणखी जे जलसाठे असतील, त्यांनी तळ गाठला आहे. वर्धा, वैनगंगा या मोठ्या नद्याही आटत आहेत. ग्रामीण भागातील हे जलस्रोतच झपाट्याने खाली गेल्याने भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे, यावर्षी अलनिनोच्या प्रभावामुळे मान्सून जुलै महिन्यात येईल, असा अंदाज आहे. त्यामुळे खरीप हंगामाची सुरुवात पाण्याविना कशी करायची, याची चिंता शेतकऱ्यांना आतापासूनच वाटू लागली आहे. मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरला. मोठ्या उत्साहाने पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी गतवर्षी खरीपासाठी उभा झाला. मात्र वरूणराजाने त्याचे कंबरडेच मोडले. यावर्षीही पावसाने अनेकवेळा शेतकºयांना दगा दिला. परिणामी शेतकºयांना पिके वाचविताना मोठी कसरत करावी लागली होती. कशीबशी शेतकºयांनी आपली पिके वाचविली. मात्र उत्पादनावर मोठा परिणाम झाला. पाहिजे तसे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला गेला. लावलेला पैसाही निघाला नाही. त्यामुळे डोक्यावरील कर्ज तो फेडू शकला नाही.
मागील वर्षी सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस पडला. त्यामुळे पाण्याचे पुनर्भरण निट होऊ शकले नाही. जिल्ह्यात ९७ तलाव आहेत. या तलावांची स्थिती अत्यंत नाजुक आहे. यातील निम्याहून अधिक तलाव आता कोरडे पडले आहे. याशिवाय जिल्ह्यात इरई, उमा, शिरणा, वर्धा, वैनगंगा यासारख्या नद्या वाहतात. मात्र या नद्यांनीही तळ गाठला आहे.
वर्धा नदी अनेक गावांची जीवनदायिनी आहे. मात्र या नदीलाही आता डबक्याचे स्वरुप आले आहे. जिल्ह्यातील नलेश्वर, पकडीगुड्डम, डोंगरगाव, आसोलामेंढा, लभानसराड, अमलनाला यासारख्या सिंचन प्रकल्पात सरासरी ३० टक्क्याहून कमी जलसाठा आहे.
या जलसाठ्यांमध्ये पाणी नसल्याने गावातील विहिरी, बोअरवेल, हातपंप यासारखे इतर जलस्रोत आटले आहे. काही ठिकाणी विहिरींमध्ये पाणी असले तरी ते गाळयुक्त आहे. त्यामुळे पाण्याची भीषण अवस्था जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांना खरिपाची चिंता
आता लवकरच शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाला सुरुवात होत आहे. शेतकरी उन्हाची तमा न बाळगता हंगामाच्या कामाला लागला आहे. हंगामपूर्व मशागतीची कामे सुरू झाली आहेत. मात्र शेतकऱ्यांकडे सिंचनाचा अभाव आहे. ग्रामीण भागात पसरलेले मामा तलावांचे जाळे शेतकऱ्यांसाठी वरदान आहेत. मात्र अत्यल्प पाऊस झाल्यामुळे मामा तलावातही पाण्याची साठवणूक होऊ शकली नाही. जिल्ह्यातील ८८ तलावांमध्ये सध्या केवळ सरासरी ९ टक्केच पाणी आहे. पुढे पाऊस लांबला तर मोठी भयावह स्थिती निर्माण होणार आहे.
चंद्रपुरातील वैयक्तिक जलस्रोतही आटले
चंद्रपूर शहराला इरई धरणातून पाणी पुरवठा केला जातो. सध्या सर्वच धरणातील जलसाठा अंतिम पातळी गाठत असला तरी इरई धरणात बऱ्यापैकी पाणी आहे. तरीही चंद्रपूरकरांना नियमित पाणी मिळत नाही. शहरातील अनेक वॉर्डात पाण्यासाठी जिवाच्या आकांताने बोंबा मारल्या जात आहेत. हातात असतानाही मनपा प्रशासन याबाबत काहीच का करीत नाही, ही बाब संताप आणणारी ठरली आहे. याशिवाय सर्वात गंभीर बाब म्हणजे चंद्रपुरातील अनेक घरांमधील विहिरी, बोअरवेल, हातपंप या वैयक्तिक जलस्रोतांनीही तळ गाठला आहे. अनेकांच्या विहिरी आटल्या आहेत. बोअरवेलला पाणी नाही. यापूर्वी पिण्यापुरते नळाला पाणी आले तरी दैनंदिन इतर गरजा नागरिक आपल्या वैयक्तिक जलस्रोतातून पूर्ण करीत होते. मात्र आता बहुतांश नागरिकांना सर्व कामांसाठी नळाच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. नळ आला नाही तर ऐन उन्हाळ्यात घरातील कुलर बंद ठेवावा लागत आहे.