मूलमध्ये आरओ मशीनद्वारे शुद्ध पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 11:23 PM2018-04-03T23:23:43+5:302018-04-03T23:23:43+5:30
तालुक्यातील उथळपेठ, चिंचाळा गावानंतर आता मूल शहरात देखील आरओ मशीनव्दारे शुद्ध पाणी पुरवठा करण्याचा पहिला प्रकल्प राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरु केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : तालुक्यातील उथळपेठ, चिंचाळा गावानंतर आता मूल शहरात देखील आरओ मशीनव्दारे शुद्ध पाणी पुरवठा करण्याचा पहिला प्रकल्प राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरु केला आहे. लवकरच मूल शहरात १० आरओ मशीन सुरु होणार असून पाच रुपयामध्ये २० लिटर पाणी मिळणार आहे. हा उपक्रम बचत गटांमार्फत सुरु ठेवण्याचा मानस पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
शहरातील २८ कोटींच्या २४ तास पाणी पुरवठ्याच्या योजनेला आकार येत असतानाच उपलब्ध असणाऱ्या जलसाठ्यातून शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी शहरात पहिल्या आरओ मशीनद्वारे पाणी पुरवठ्याचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. शहरातील सर्व उपलब्ध जलसाठ्याचा वापर शुद्ध पाण्यासाठी करण्यात यावा, असे वॉर्ड नं. चार मधील कृषी उत्पन्न बाजार समितीतील आरओ मशीनचे उद्घाटन करताना पालकमंत्र्यांनी सांगितले.
आयटीसी कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून हा आरओ प्रकल्प उभा करण्यात आला. मूलमध्ये नागपूर सारखी २४ तास पाणी पुरवठा योजना सुरु होणार आहे. त्या जोडीला ही आरओ मशीनची सुविधा सध्या उपलब्ध झाली आहे. यात ५ रुपयामध्ये २० लिटर शुद्ध पाणी दिले जाणार आहे. याप्रसंगी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, माजी जि. प. अध्यक्ष संध्या गुरुनुले, नंदू रणदिवे, संगीता वाळके, विद्या बोबाडे, रेखाताई येरणे, मनीषा गांडलेवार आदी उपस्थित होते.
प्रयोग यशस्वी झाल्यास आरओ मशीन वाढविणार
मूल येथील अभिनव प्रयोग असून महिला बचत गट या शुद्ध पाण्याच्या एटीएमला पुढे सुरु ठेवणार आहेत. मोफत दिलेल्या सुविधेला महत्त्व राहत नाही. पाणी हे जीवन असून रोजच्या आयुष्यात त्याचे महत्व आहे. त्यामुळे बचत गट हे यापुढे ही यंत्रणा चालवेल, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. हा प्रयोग यशस्वी झाल्यास शहरात अधिक नऊ आरओ मशीन सुरु करण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.