गोसेखुर्दच्या नहराचे काम रखडल्याने रस्ते प्रभावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 12:12 AM2017-12-03T00:12:30+5:302017-12-03T00:13:27+5:30
सन १९८३ साली तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी गोसेखुर्द प्रकल्पाचे भूमिपूजन केले. तेव्हापासून आजपर्यंत ३४ वर्षांचा कालावधी होत असतानाही या प्रकल्पाच्या नहराचे काम अपूर्ण आहे.
आॅनलाईन लोकमत
चिखलपरसोडी : सन १९८३ साली तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी गोसेखुर्द प्रकल्पाचे भूमिपूजन केले. तेव्हापासून आजपर्यंत ३४ वर्षांचा कालावधी होत असतानाही या प्रकल्पाच्या नहराचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे अनेक रस्ते प्रभावित झाले असून नहराचे काम पूर्ण झाल्यास काही मुख्य रस्ते नहरात जाणार आहेत.
नागभीड तालुक्यातील काही गावांच्या संपर्कात उजव्या कालव्याचे काम आले आहे. तर त्याच कालव्याचे घोडाझरी नहरही काही गावांच्या मुख्य रस्त्याला छेदून समोर गेले आहे. हे नहर साधारणत: ६० फूट खोल व ४० फूट रुंद व पाण्याने भरून आहे. त्यामुळे पाण्याच्या दबावामुळे माती खचत जावून खिंडार पडले आहेत.
अशीच अवस्था किरमीरी मेंढा या गावाला जाणाऱ्या रस्त्याची झाली आहे. या गावाच्या मुख्य रस्त्याला छेदून घोडाझरी शाखा कालव्याचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही टोकापर्यंत नहराचे खोदकाम झालेले आहे व नहर पाण्याने फुल्ल भरून असल्याने या रस्त्याच्या खालची जागा दलदलसारखी झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन एखादे जड वाहन गेले तर रस्त्यासोबत वाहनही कालव्यामध्ये जाते की काय, अशी अवस्था या रस्त्याच्या स्थितीवरून दिसून येते. उंच गवत व वळणदार रस्त्यामुळे नहराचे झालेले खोदकाम जवळ गेल्याशिवाय नजरेस पडत नाही. त्यामुळे केव्हाही अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या ठिकाणी सूचना फलक लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
रस्त्यालगत असलेल्या नहराच्या समोरील गवत काढून धोक्याची सूचना देणारा फलक लावणे अगत्याचे आहे. तसेच रखडलेले काम लवकर पूर्ण करून त्याचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना व्हावा.
- मनोहर चौधरी, सरपंच, ग्रामपंचायत किरमिरी मेंढा.
ज्या ठिकाणी धोकादायक परिस्थिती आहे, त्या सर्व ठिकाणी सूचना फलक लावून रखडलेले काम लवकरच सुरू केले जाईल.
- व्ही.व्ही. ओचावार, शाखा अभियंता, नागभीड