न्यायालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचा मार्ग बंद; निवडणुकीच्या अनुषंगाने निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 12:18 PM2024-11-19T12:18:56+5:302024-11-19T12:19:42+5:30
पोलिस प्रशासनाचा आदेश : ईव्हीएम वाहनांसाठी वाहतूक व्यवस्थेत बदल
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चंद्रपूर तहसील कार्यालयातून मंगळवारी (दि.१९) ई.व्ही.एम. मशीन जिल्ह्यातील सहा मतदान केंद्रांत नेण्यात येणार आहे. बुधवारी (दि. २०) ईव्हीएम मशीन जमा करण्यासाठी वाहने या कार्यालयात येतील.
त्यामुळे उपरोक्त दोन दिवस जिल्ह्याधिकारी कार्यालय मुख्य गेट मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिली. १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजतापासून २१ नोव्हेंबरच्या सकाळी ६ वाजेपर्यंत न्यायालयाच्या मेन गेटपासून ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य गेटपर्यंतचा डाव्या बाजूचा पूर्ण रस्ता हा ईव्हीएम मशीन घेऊन जाणाऱ्या वाहनाखेरीज इतर सर्व वाहनांना वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. दोन्ही बाजूचे रस्ते हे 'नो पार्कीग व नो हॉकर्स झोन' म्हणून घोषित करण्यात आला. या मार्गावर नागरिकांनी वाहने पार्किंग करू नये, हातठेले लावू नये, असा आदेश पोलिस अधीक्षकांनी जारी केला.
असे आहेत तीन वाहनतळ
ईव्हीएम मशीन घेऊन जाणे व येणाऱ्या वाहनांसाठी तीन ठिकाणी वाहनतळ घोषित करण्यात आले. यामध्ये नियोजन भवनच्या बाजूला पार्किंग (छोटे वाहन), जिल्हाधिकारी कार्यालय मुख्य गेटच्या उजव्या बाजूला (बसेस व मोठे वाहन), न्यायालयाच्या मेन गेटपासून ते जिल्हाधिकारी मेन गेटपर्यंत डाव्या बाजूला (बसेस व मोठे वाहन) अशा तीन वाहन- तळांचा समावेश आहे.