नकोडाजवळ रस्ता बंद, मुकुटबन एसटी बंद, प्रवाश्यांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:27 AM2021-03-26T04:27:34+5:302021-03-26T04:27:34+5:30
मागील दोन वर्षापासून सदर रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. घुग्घुस- नकोडा- मुंगोली- मार्गावरील वाहतूक एसीसी सुरक्षा भिंतीला लागून असलेल्या ...
मागील दोन वर्षापासून सदर रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. घुग्घुस- नकोडा- मुंगोली- मार्गावरील वाहतूक एसीसी सुरक्षा भिंतीला लागून असलेल्या रस्त्यावरून मुंगोली, साखरा, शिंदोला मार्गा वरील सर्व वाहतूक गेल्या तीन दिवसा पासून बंद आहे. नकोडा ग्रामपंचायतने गावाजवळ बॅरीकेट्स लावले आहे. काही दिवसांपूर्वी रस्त्यावर गिट्टी पसरवून कंत्राटदाराने काम बंद केले. वाहतूक करताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. कोळसा वाहतूक करणारे ट्रान्स्पोर्टर कमी वेळात अधिक करून डिझेल वाचविण्यासाठी या रस्त्याचा उपयोग करीत आहे. कोळशाची वाहतूक बंद करावी यासाठी नकोडा ग्रामपंचायतने येथील ठाणेदाराला निवेदन दिले व कोळसा वाहतुकदारांना सूचना केल्या मात्र वाहतूक थांबली नाही. त्यामुळे नकोडा ग्रामपंचायतने बॅरीकेट्स लावून रस्त्यावरील वाहतूक अडविली. त्यात एसटीही अडली. या आडमुठ्या धोरणामुळे घुग्घुस-मुंगोली-शिंदोला मार्गावरील प्रवाश्यांची गैरसोय झाली आहे. मुंगोलीचे सरपंच रुपेश ठाकरे यांनी चंद्रपूर एसटी डेपोच्या अधिकाऱ्याशी संपर्क केला असता या रस्त्याची पाहणी केली.