रस्त्याचे बांधकाम संथगतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 11:53 PM2019-04-19T23:53:10+5:302019-04-19T23:56:59+5:30
येथील नगर परिषदेच्या रस्त्यांचे काम अतिशय संथगतीने सुरु आहे. मात्र याकडे नगर परिषद प्रशासनाचे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असून बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर कुणाचेच नियंत्रण नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : येथील नगर परिषदेच्या रस्त्यांचे काम अतिशय संथगतीने सुरु आहे. मात्र याकडे नगर परिषद प्रशासनाचे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असून बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर कुणाचेच नियंत्रण नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
ग्रामपंचायतीच्या काळात बनविण्यात आलेल्या नागभीडच्या रस्त्यांची एकंदर स्थिती लक्षात घेऊन या रस्त्यांचे पुनरूज्जीवन करण्यात यावे, अशी मागणी होत होती. दरम्यान नगर परिषदची स्थापन झाल्यानंतर वर्षभरातच लोकनियुक्त कार्यकारी मंडळांनी रस्ते आणि नालीच्या कामास प्राधान्य देऊन ही कामे प्रस्तावित करीत शासनाकडून निधी आणला. मात्र बºयाच कालावधीनंतर पहिल्या टप्प्यात नाल्यांचे काम करण्यात आले. त्यानंतर रस्त्याच्या कामास सुरूवात करण्यासाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले. याला तीन महिन्यांचा कालावधी लोटत आहे. मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली.
रस्त्याचे खोदकाम केल्याने रस्त्यांची अवस्था अतिशय गंभीर झाली आहे. परिणामी नागभीडच्या रस्त्यांनी ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच या रस्त्यावरून जड वाहणांची ये-जा सुरू असल्याने रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. याबाबत अनेकदा तक्रारही करणयात आली आहे. मात्र संबंधित अधिकारी व जनप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
या रस्त्यांचे केले खोदकाम
नागभीडमध्ये रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी अनेक रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे. त्यामध्ये जनता शाळेपासून वस्तीत जाणारा रस्ता, टाकीज चौकातून मानी मोहल्यात जाणारा रस्ता, राम मंदिराकडून गोरोबा चौकात जाणारा रस्ता यासह अन्य रस्त्यांची हिच अवस्था आहे. अर्धवट कामामुळे लहान-लहान अपघातही घडल्याची माहिती आहे.
माध्यमांनी घेतली दखल
रेंगाळत असलेल्या या रस्त्याच्या कामाबाबत आणि नागरिकांना होत असलेल्या त्रासाबाबत येथील माध्यमांनी वारंवार आवाज उठवला. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.