रस्ते विकास कामांचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 11:03 PM2018-06-19T23:03:42+5:302018-06-19T23:03:56+5:30
नक्षलग्रस्त व शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील महामार्गासह सहा हजार कोटींच्या रस्ते विकास कामांना उच्चस्तरीय बैठकीत विविध मंजुरी देण्यात आली आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक रस्त्यांचा समावेश आहे. या कामांना गती येणार असल्याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : नक्षलग्रस्त व शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील महामार्गासह सहा हजार कोटींच्या रस्ते विकास कामांना उच्चस्तरीय बैठकीत विविध मंजुरी देण्यात आली आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक रस्त्यांचा समावेश आहे. या कामांना गती येणार असल्याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली.
केंद्रिय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी परिवहन भवन येथे केंद्रिय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मदन येरावार, गडचिरोलीचे खासदार अशोक नेते, आ. नाना श्यामकुळे, आ. अॅड. संजय धोटे, वणीचे आ. रेड्डी तसेच केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यातील रस्ते विकास कामांची आढावा बैठक झाली.
तीनही जिल्ह्यांतील ‘भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत’ बांधण्यात येणारे आठ महामार्ग, ‘अभियांत्रिकी, खरेदी व बांधकाम(ईपिसी) कार्यक्रमांतर्गत’ बांधण्यात येणारे नऊ रस्ते आणि ‘केंद्रिय रस्ते निधीतून’ करण्यात येणाऱ्या २२ कामांचा आढावा घेण्यात आला. रस्ते विकास कामांसंदर्भातील विविध मंजुरी देण्यात आल्या. तसेच या कामांसाठी आवश्यक असणारी वन विभागाची मंजुरी व रस्ते बांधकामांचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देशही देण्यात आल्याचे ना. अहीर यांनी यावेळी सांगितले.
तीनही जिल्ह्यांतील रस्त्यांचे विकास कामे अंतिम टप्प्यात असून येत्या तीन महिन्यात विविध कामांचे उद्घाटनही होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
बंधारा व पुलाचा प्रायोगिक प्रकल्प
केंद्रिय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या वतीने ‘वणी ते वरोरा’ महामार्गादरम्यान वर्धा नदीवर ‘बंधारा व पूल’ बांधण्याचा प्रायोगिक प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या संदर्भातही मंगळवारी चर्चा झाली. या पुलाच्या माध्यमातून वाहतूक व जलसंधारणाचे उत्तम कार्य होऊ शकते व हा प्रयोग यशस्वी झाल्यास इतर भागांमध्ये याचे अनुकरण करण्यात येईल, असा चर्चेचा सूर होता.
बाबुपेठ उड्डाणपुलाबाबत चर्चा
चंद्रपूर शहारात ३५० कोटी रुपये खर्चून बाबुपेठ रेल्वे क्रासींगवर उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. या बांधकामाबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. याशिवाय अन्य १० कामांचाही आढावा घेण्यात आला.
महामार्गांचा घेतला आढावा
मंगळवारी झालेल्या बैठकीत वणी ते वरोरा या ९३० क्रमांकाच्या १८ कि.मी., ब्राह्मणी-राजुरा-वरुड- देवरापूर या ३० कि.मी व राजुरा-कोरपना-आदिलाबाद या ५७ कि.मी. लांबीच्या महामार्गांचा आढावा घेण्यात आला.