ब्रह्मपुरी तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था
By admin | Published: May 23, 2014 11:44 PM2014-05-23T23:44:37+5:302014-05-23T23:44:37+5:30
ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक गावांतील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. काही दिवसापूर्वी रस्ते दुरुस्त करण्यात आले असतानाही या रस्त्यांचे तीनतेरा वाजले आहे. त्यामुळे दोषींवर कडक कारवाई करावी,
गांगलवाडी: ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक गावांतील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. काही दिवसापूर्वी रस्ते दुरुस्त करण्यात आले असतानाही या रस्त्यांचे तीनतेरा वाजले आहे. त्यामुळे दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तालुक्यातील प्रमुख रस्ता ब्रह्मपुरी ते गांगलवाडी हा आहे. सदर रस्त्याची काही दिवसापूर्वीच दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. बरडकिन्ही येथील नागरिकांना गांगलवाडीला येण्यासाठी हा रस्ता अत्यंत उपयुक्त आहे. परंतु हा रस्ता पुर्णपणे कच्चा असल्याने या रस्त्याची गिट्टी निघालेली आहे. त्यामुळे या रस्त्याने अनेकवेळा अपघात झाले आहेत. परंतु हा रस्ता दुरुस्त करण्याकडे पूर्णत: दुर्लक्ष करीत आहे. मुडझा ते भुज हा रस्ता देखील अत्यंत बिकट स्थितीत आहे. हा रस्ता डांबरी असून काही ठिकाणी कच्चा आहे. या रस्त्याचे मधोमध झालेले डांबरीकरणाचे कामदेखील कंत्राटदारांनी निकृष्ट केल्याने या रस्त्याची वाट लागली आहे. मुडझा ते गेवरा या रस्त्याला जागोजागी खड्डे पडल्यामुळे हा रस्ता देखील अपघाताला आमंत्रण देत आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देवून रस्त्याची दुरुस्ती करावी.अशी मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)