रस्त्यावरील कचरा साफ करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:44 AM2020-12-15T04:44:17+5:302020-12-15T04:44:17+5:30
जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी राजुरा: मोकाट जनावरांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यावर ही जनावरे उभी राहत असल्याने मार्ग काढण्यास ...
जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी
राजुरा: मोकाट जनावरांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यावर ही जनावरे उभी राहत असल्याने मार्ग काढण्यास अडचणी येतात. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला. मोकाट कुत्रे दुचाकीस्वारांच्या मागे धावतात. त्यामुळे या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
सिमेंटीकरणाची नागरिकांची मागणी
चंद्रपूर : येथील तुळशीनगर, वृंदावननगरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे काही रस्त्यांवर चिखल साचले आहे. यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देवून येथील रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे. यापूर्वी अनेकदा मागणी करुनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
शेकडो ग्राहक त्रस्त
सावली : तालुक्यातील बहुतांश गावात इंटरनेसेवा ढिम्म असल्याने नागरिकांना व्यवहार करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, काही बँकामध्येही हिच समस्या असल्यामुळे ग्राहकांना ताटकळत रहावे लागते. त्यामुळे इंटरनेट सेवा सुरळीत करावी, अशी मागणी आहे.
बँक कर्जमाफ करा
चंद्रपूर : बेरोजगारीवर मात करून आॅटो चालकांनी व्यवसाय उभा केला आहे. मात्र कोरोना संकटामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. आॅटोसाठी घेतलेले कर्ज फेडणे कठीण झाले आहे. त्यामुळे आॅटोरिक्षा चालकांचे बँक कर्ज माफ करण्याची मागणी केली जात आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त
राजुरा : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांवर खड्डे पडल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देवून दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
मजुरी कमी असल्याने आर्थिक अडचण
चंद्रपूर : कोरोनामुळे यावर्षी बांधकाम क्षेत्र प्रभावित झाले आहे. अनेकांनी घर बांधकाम करण्याचा बेतही पुढे ढकलता आहे. मात्र जे बांधकाम सुरु आहे. त्यामध्ये मजुरांना अत्यल्प मजुरी दिली जात असल्यामुळे मजुरी वाढवून देण्याची मागणी कामगारांनी केली आहे. शहरात बाहेरराज्यातील बांधकाम मजुरांची संख्या अधिक आहे. त्यामुळे खर्च भागवितांना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.