सावली तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था
By admin | Published: December 1, 2015 05:29 AM2015-12-01T05:29:35+5:302015-12-01T05:29:35+5:30
सावली तालुक्यातील रस्त्यांची अतिशय दुर्दशा झाली असून त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष : गावकऱ्यांनी दिले बांधकाम विभागाच्या अभियंत्याला निवेदन
चंद्रपूर: सावली तालुक्यातील रस्त्यांची अतिशय दुर्दशा झाली असून त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष खुशाल लोडे यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना निवेदन दिले आहे.
व्याहाड ते ब्रह्मपुरी या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे व्याहाड ते ब्रह्मपुरी रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे. या मार्गावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम मागील तीन महिन्यापूर्वी करण्यात आले. मात्र परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली आहे. जागोजागी पडलेल्या खड्डयांमुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यात खड्डा की, खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही. हा मार्ग गडचिरोली-चंद्रपूर राज्य महामार्गाला जोडणारा असल्याने व व्याहाडच्या आजूबाजुच्या गावानी म्हणजे गेवरा परिसरातील लोकांना व्याहाडला कामानिमित्त जावे लागते. विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयासाठी व्याहाड किंवा गडचिरोली येथे शिक्षण घेण्यासाठी रोज ये-जा करावी लागते. व्याहाडला आठवडी बाजार भरत असल्याने त्या दिवशी या मार्गावरून जाणारी वाहने, बैलबंडी व पायी जाणाऱ्यांना तारेवरची कसरत करुनच जावे लागते. विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांना बाजु देताना वाहन किंवा बैलबंडी रस्त्याच्या खाली उतरवावी लागते. त्यामुळे या मार्गाचे रुंदीकरणाचे व डांबरीकरणाचे काम करण्यात यावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. व्याहाड ते ब्रह्मपुरी मार्गाचे मागील १५ वर्षांपासून डागडुजीचे काम सुरु आहे. पाऊस पडला की खड्डे तयार होतात. दाबगाव मौशी ते गेवरा (बुज.) पर्यंत रस्त्यावर मोठ मोठे खड्डे निर्माण झाले झाले असून ेबांधकाम विभाग केवळ खड्डे बुजविण्याचे काम मागील १५ वर्षांपासून करीत आहे. व्याहाड ते ब्रह्मपुरी रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाकडेही दुर्लक्ष होत आहे. येथील नागरिकांना कामानिमित्त याच मार्गाचा आधार घ्यावा लागतो.
यासोबतच तालुक्यातील कोंडेखल ते शिंदोळा रस्त्याचे डांबर मागील तीन वर्षांपासून उखडून आहे. हा रस्ता तालुक्याच्या ठिकाणापर्यंत जात असल्यामुळे लोकांना तालुकास्थळी दररोजच कामानिमित्त जावे लागते. आता तर या रस्त्यावरील गिट्टी बाहेर निघाली आहे. रस्त्यावरुन मोटारसायकल, बैलबंडी चालविणे कठीण झाले आहे. या रस्त्यावर डांबराचा पत्ताच नाही. केवळ गिट्टी निघालेली व ठिक-ठिकाणी खड्डे असलेला असा हा रस्ता झाला आहे. याच रस्त्याने महामंडळाची एसटी बससुद्धा जाते. परिसरातील लोकांना याचा किती त्रास सहन करावा लागत आहे.
पालेबारसा ते उसरपार चक या मार्गावर एक वर्षापासून मोठ मोठ्या भेगा पडून आहेत. या भेगांकडे बांधकाम विभाग लक्ष देईल काय, असा नागरिकांचा सवाल आहे. सावली ते बोथली या पाच किलोमिटर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.
या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी खुशाल लोडे, बारसागड येथील डोमाजी चौधरी, मोरेश्वर चौधरी, समिर चौधरी, वासुदेव मोराडे, आकाश वाघरे, धनराज चौधरी, मेहा बुज. येथील सर्वश्री ग्रा.पं. सदस्य जितेंद्र श्रीकोंडावार, पंकज दळांजे, ईश्वर कोलते, प्रकाश कोलते, चिमणदास निकुरे, गुरुदास गेडाम, टिकचंद मारभते, राजू गेडाम, प्रभाकर पेंदाम आदींनी केली आहे. (प्रतिनिधी)
तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या निफंद्रा ते मंगरमेंढा, गेवरा, बारसागड ते मेहा (बुज.) या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात काटेरी व लहान- लहान झुडपे तयार झाली आहेत. येथे मार्गक्रमण करणाऱ्यांना काटेरी झुडपांमुळे समोरील वाहन किंवा प्राणी दिसत नसल्याने अपघात होत आहेत. झुडपे तोडण्याची मागणी दिनांक ५ नोव्हेंबरला करण्यात आली होती. परंतु आज १५ ते २० दिवसांचा कालावधी होवून सुद्धा या मागणीकडे रोहयोच्या कार्यकारी अभियंत्यांनी लक्ष न दिले नसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. आहे.