सहा महिन्यांत रस्त्यांची डागडूजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 11:48 PM2017-12-12T23:48:28+5:302017-12-12T23:48:52+5:30
गोंडपिपरी सार्वजनिक बांधकाम उपविगाच्या कार्यक्षेत्रातील कोठारी-तोहोगाव-लाठी अनेक रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.
आॅनलाईन लोकमत
कोठारी : गोंडपिपरी सार्वजनिक बांधकाम उपविगाच्या कार्यक्षेत्रातील कोठारी-तोहोगाव-लाठी अनेक रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दर सहा महिन्यांत डागडूजी केल्या जात असल्याने हा निधी वाया जात आहे, असा आरोप परिसरातील नागरिक करीत आहेत.
कोठारी परिसरात काही वर्षांपासून लोकप्रतिनिधींचे लक्ष होते. त्यामुळे रस्त्याकडे त्यांचे विशेष लक्ष होते. रस्त्यांची नेहमी डागडूजी केली जात होती. कोठारी ते लाठी ३५ किमी लांबीच्या रस्त्याचा पुरता बोजवारा उडाला आहे. ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. गिट्टी, मुरूम विखुरले. वाहनधारक व पायदळ जाणाºयांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. चारचाकी व दुचाकी वाहन चालकांना तारेवरची कसरत करून वाहन चालवावे लागते. विशेष म्हणजे, परिसरातील अनेक रस्त्यांचे खड्डे सहा महिन्यांनी बुजविले जातात. त्यावर लाखो रुपयांची उधळपट्टी होते. परंतु, अधिकाºयांच्या नाकर्तेपणा व खाबुगिरीने कंत्राटदार मालामाल झाले आहेत. पण, रस्त्यांची स्थिती सुधारली नाही. संबंधित वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन गैरव्यवहार बंद करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
झुडुपांनी वेढलेला रस्ता
कोठारी-लाठी मार्ग संपूर्णत: उखडला आहे. रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून डांबरीकरण नाहीसे झाले. या रस्त्याच्या दोन्ही बाजूने झुडूपांच्या रांगा आहेत. झाडाच्या फांद्या रस्त्यावर आल्या आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या वळणावरुन जाताना अपघाताची शक्यता आहे. संबंधित विभागाने ही झाडे तोडून रस्ता मोकळा करावा.
कारवाईची मागणी
कोठारी-लाठी या रस्त्यावर दर सहा महिन्यांनी खड्डे बुजविले जाते. मात्र, स्थिती जैसे थे आहे. डांबरीकरण तसेच झुडूपे कापण्याचे काम यापूर्वीही झाले होते. या खर्चाची चौकशी करून संबंधित अधिकारी आणि अभियंत्यावर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील जनता करीत आहे.