रस्ते रुंदावणार, जलवाहिन्या बदलणार
By admin | Published: August 20, 2014 11:25 PM2014-08-20T23:25:26+5:302014-08-20T23:25:26+5:30
चंद्रपुरातील अरुंद रस्त्यांचे रुंदीकरण व खिळखिळ्या झालेल्या जलवाहिन्या बदलविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज बुधवारी झालेल्या महापालिकेच्या आमसभेत घेण्यात आला. याला सभागृहाने मंजुरीही दिली.
भाजीपाला विक्री केंद्र : मनपाच्या आमसभेत मंजुरी
चंद्रपूर : चंद्रपुरातील अरुंद रस्त्यांचे रुंदीकरण व खिळखिळ्या झालेल्या जलवाहिन्या बदलविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज बुधवारी झालेल्या महापालिकेच्या आमसभेत घेण्यात आला. याला सभागृहाने मंजुरीही दिली.
महानगरपालिकेची आमसभा आज मनपाच्या सातमजली इमारतीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी अजेंड्यात ठेवण्यात आलेल्या सर्व विषयांना कोणताही वादविवाद न होता मंजुरी मिळाली, हे विशेष. चंद्रपूर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. वाहनांची संख्याही वाढली आहे. मात्र ३० वर्षांपूर्वीचे रस्ते आजही तसेच कायम आहे. त्यामुळे शहरात नेहमीच वाहतूक व्यवस्थेचे बारा वाजताना दिसतात. शहर विकास आराखड्यानुसार एकाही रस्त्याचे रुंदीकरण महापालिकेला आजवर करता आले नाही. त्यामुळे आता या रस्त्याच्या रुंदीकरणाबाबत आमसभेत जोरदार चर्चा करण्यात आली. शहरातील प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमण झाले आहे. ते अतिक्रमण काढून व गरज आहे तिथे भूसंपादन करून रस्ते रुंदीकरण करण्याच्या प्रस्तावाला सभागृहाने मंजुरी दिली. याशिवाय पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांचाही प्रश्न बिकट आहे. जुन्या जलवाहिन्या आता खिळखिळ्या झाल्या आहे. या जलवाहिन्या बदलवून नवीन जलवाहिन्या टाकण्यालाही आमसभेत सर्व नगरसेवकांनी मंजुरी दिली. त्यामुळे आता चंद्रपूरकरांना शुध्द पाण्याचा पुरवठा होऊ शकणार आहे.
१० वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणानुसार महापालिका मालमत्ता कर आकारणी करीत आहे. मागील १० वर्षांत अनेक नवीन इमारती बांधण्यात आल्या आहेत. याशिवाय अनेक निवासी इमारतींचे व्यावसायिकीकरण झाले आहे. यात महापालिकेला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता शहरातील प्रापर्टीचे नव्याने सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. वेकोलिच्या दुर्गापूर, भटळी कोळसा खाणीतील ब्लॉस्टिंगमुळे तूकूम परिसरात जलशुध्दीकरणाची पाईप लाईन वेळोवेळी फुटते. त्यामुळे आता वेकोलिच्या खनिज विकास निधीतून या पाईपलाईनमध्ये सुधारणा करण्याचा निर्णयही आजच्या आमसभेत घेण्यात आला.
शेतकऱ्यांसाठी यंदा प्रथमच महापालिकेने सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. जे शेतकरी आपल्या शेतामध्ये भाजीपाला, कडधान्यांची लागवड करतात. त्यांना आपला शेतमाल दलालाशिवाय थेट विकता यावा, यासाठी भाजीपाला विक्री केंद्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शहरातील प्रत्येक झोनमध्ये हे केंद्र असणार आहे. तिथे शेतकऱ्यांना आपला शेतमाल थेट ग्राहकांना विकता येणार आहे. याला आमसभेने मंजुरी दिली आहे. (शहर प्रतिनिधी)