वरोरा पोलिसांची भूमिका संशयास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 11:08 PM2019-01-22T23:08:05+5:302019-01-22T23:08:24+5:30
वरोरा-नागपूर महामार्गावर जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनाने प्रकाश मेश्राम या पोलीस शिपायाचा कर्तव्य बजावत असताना नाहक बळी घेतला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मात्र या घटनेबाबत पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या माहितीवरून वरोरा पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लागत आहे. या प्रश्नांचा उलगडा वरिष्ठ पोलीस अधिकारी करतील काय, असा प्रश्न इमाने-इतबारे कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसह जनतेला पडला आहे.
राजेश भोजेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वरोरा-नागपूर महामार्गावर जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनाने प्रकाश मेश्राम या पोलीस शिपायाचा कर्तव्य बजावत असताना नाहक बळी घेतला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मात्र या घटनेबाबत पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या माहितीवरून वरोरा पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लागत आहे. या प्रश्नांचा उलगडा वरिष्ठ पोलीस अधिकारी करतील काय, असा प्रश्न इमाने-इतबारे कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसह जनतेला पडला आहे.
पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या घटनाक्रमात जनावरे तस्करी करणारे वाहने वणीकडून भरधाव येत होती, असे नमुद केले. मग ही जनावरे नेमकी कुठून आणली? कोणाकडून ती खरेदी केली, याचा शोध पोलीस प्रशासन घेईल काय, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
वणीकडून ही वाहने वरोरा मार्गे नागपूरकडे भरधाव जात होती. त्यांना तैनात पोलीस कर्मचाऱ्यांनी थांबविण्याचा प्रयत्न केल्याची बाबही पोलिसांनी दिलेल्या घटनाक्रमात नमुद आहे. मात्र ती वाहने न थांबल्यामुळे प्रभारी अधिकाऱ्यांना माहिती दिल्याचे म्हटले आहे. पोलीस तैनात होते तर ते कोणत्या कारणाने, ही बाबही येथे लक्षात घेण्यासारखी आहे. ती वाहने सुसाट वेगाने पुढे निघाली. या वाहनाने खांबाडा येथे डोळ्यात तेल टाकून कर्तव्य बजावत असलेले शिपाई प्रकाश मेश्राम यांना चिरडून त्यांचा नाहक बळी घेतला. पोलिसांनी याप्रकरणात घटनेपूर्वीपर्यंत दिलेला एकूणच घटनाक्रम संशयाला घ्यायला लावणारा आहे. याची सखोल चौकशी केल्यास वास्तव पुढे येईल, असे काही पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.
जनावरे वाहनात नेमकी कुठून कोंबली?
सदर घटनेतील दोन्ही वाहनांची वणीकडे जाताना वरोरा टोल नाक्यावर ७ वाजून २७ मिनिट २३ सेकंद व ७ वाजून २७ मिनिट ५६ सेकंदाला नोंद झाली आहे. याचाच अर्थ यानंतरच्या तीन तासांमध्ये सारेकाही घडले आहे. ती वाहने जनावरे घेण्यासाठी वणीकडे गेली असेल. नंतर ती जनावरे वाहनात कोंबून पुन्हा नागपूरच्या दिशेने निघाली असेल. वाहने जेव्हा टोल नाक्यावरून वणीकडे जात होती. तेव्हा त्या वाहनांमध्ये जनावरे नव्हती, असे पोलिसांनी दिलेल्या घटनाक्रमावरून लक्षात येते. मग ही वाहने वणीकडे नेमकी कुठे गेली. ती जिथे गेली तिथपर्यंत त्या वाहनांना पोहचायला लागलेला वेळ आणि ती रिकामी असेल तर वाहनांमध्ये जनावरे कोंंबून भरायला लागलेला वेळ नेमका किती. ती जनावरे कोणाकडून खरेदी केली. याचा शोध पोलिसांनी घेणे गरजेचे आहे.
ती जनावरे कुठे नेली जात होती?
जनावरांची तस्करी वणीकडून नागपूरकडे होत असेल, तर ती जनावरे नेमकी कुठे नेली जात होती आणि कशासाठी, याचे उत्तर वरोरा पोलिसांकडून अपेक्षित नाही ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शोधण्याची गरज या घटनेने पुढे आली आहे. आजवर नागपूरकडून वरोरामार्गे जनावरांची तस्करी झाल्याची अनेक प्रकरणे पुढे आली आहे. परंतु वणीकडून नागपूरकडे जनावरांची तस्करी होत असल्याची ही पहिलीच घटना असून याबाबत जनता साशंक आहे. या प्रकरणाचा शोध लावून या घटनेत नाहक बळी ठरलेले शिपाई प्रकाश मेश्राम यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्याची मागणी या घटनेने धास्तावलेले पोलीस शिपाई दबक्या आवाजात करीत आहेत.