बल्लारपूर-चंद्रपूर मार्गाची रम्यता
By Admin | Published: July 15, 2015 01:12 AM2015-07-15T01:12:22+5:302015-07-15T01:12:22+5:30
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गर्द हिरवी श्रीमंती, लहान मोठे २२ वळणं, डांबर व सिमेंटद्वारे रोडच्या नूतनीकरणाने मार्गात आलेली चकाचकता व प्रशस्तता, ...
१२ किमी अंतरावर २२ वळण : हिरवी श्रीमंतीसदृश्य घाटरोड
वसंत खेडेकर बल्लारपूर
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गर्द हिरवी श्रीमंती, लहान मोठे २२ वळणं, डांबर व सिमेंटद्वारे रोडच्या नूतनीकरणाने मार्गात आलेली चकाचकता व प्रशस्तता, मार्गात काही जागांवर घाटरोड सदृष्य उंच व सखलता, हिरवळीतून येणारी व स्पर्शाने आपली जाणीव करुन देणारी कधी हलकी व कधी सळसळणारी वाऱ्याची झुणूक... अशी मनभावन आल्हादकता रम्यता बल्लारपूर- चंद्रपूर बस मार्गावर बघायला, अनुभवायला मिळते. बारा किलोमीटर एवढ्या कमी लांबीच्या रोडवर २२ वळणं हे या मार्गाचे वैशिष्ट्य म्हणता येईल.
या मार्गाच्या बाजूला पेपर मील कॉलनीजवळ रोड लगत टाकाऊ चुन्याने तयार झालेला बराच उंच व तेवढाच पसरट पहाड उभा आहे. स्लज गार्डन नावाने ओळखला जाणारा हा मानवनिर्मित पहाड उन्हाळ्याच्या दिवसता पांढरा-शुभ्र तर पावसाळा व हिवाळ्यात त्यावरील हिरव्या झाडांच्या-गवताच्या आवरणामुळे हिरवेगार होतो. पुढे एक दोन वळणं पार केल्यानंतर पावर हाऊस जवळ उंचवटा लागतो. तो पार केला की लगेच एका टेकडीला वळसा घालत परत उतार, उंच सखल हा भाग पार करताना घाटरोडचा हलकासा अनुभव येतो. बल्लारपूर बसस्थानक ते चंद्रपूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंत एकूण २२ वळण आहेत.
या दरम्यान वृक्षराशीसोबतच या रोडवर पेपर मील उद्योग, कलामंदिर, दर्गा, शासकीय केंद्रीय विद्यालय, वृद्धांची काळजी वाहणारे मातोश्री वृद्धाश्रम, त्याला लागूनच सैनिकी विद्यालय आणि अभियांत्रिकी महाविद्यालय, प्रसिद्ध भिवकुंड नाला इत्यादी पुढे चंद्रपूर बस स्थानकापर्यंत ६ लहान-मोठे वळण आहेत. या मार्गावर बंगाली कॅम्पधील दुर्गा मंदिर, मच्छि नाला, सावरकर चौक, पोलीस मुख्यालय इत्यादी येतात. पूर्वी एकपदरी असलेला हा रस्ता आता चारपदरी झालेला आहे. आधुनिक रहदारीच्या नियमाप्रमाणे प्रत्येक वळणावर सुरक्षितेच्या दृष्टीने वाहनांकरिता दिशा दर्शक म्हणून रेडियम बिंदुची व्यवस्था करण्यात आली आहे.
जे वाहनांच्या प्रकाशझोताने प्रखरपणे उजळतात आणि दिव्यांची एक मालिकाच तयार होते. रात्रीला हे दृष्य मनोभावन होते. दिवसा या रस्त्यावर वाहनधारकांना हिरवळीची सोबत तर रात्रीला वाहनांच्या दिव्याने उजळणारे हे दिवे अशी ही या रोडवरची रम्यता डोळ्यात साठवून ठेवावी अशी आहे. बल्लारपूर- चंद्रपूर या मार्गावरचा हा अनुभव साऱ्यांनीच घ्यावा !