छत कोसळले
By admin | Published: June 26, 2014 11:11 PM2014-06-26T23:11:08+5:302014-06-26T23:11:08+5:30
अहेरी तालुक्यातील पेरमिली परिसरातील चौडमपल्ली या गावातील अंगणवाडी केंद्राच्या इमारतीचे छत पावसाने मंगळवारी रात्रोच्या सुमारास कोसळले. मात्र दिवसाची घटना नसल्याने जीवितहानी टळली.
जीवितहानी टळली : चौडमपल्ली येथील अंगणवाडीचे
पेरमिली : अहेरी तालुक्यातील पेरमिली परिसरातील चौडमपल्ली या गावातील अंगणवाडी केंद्राच्या इमारतीचे छत पावसाने मंगळवारी रात्रोच्या सुमारास कोसळले. मात्र दिवसाची घटना नसल्याने जीवितहानी टळली.
पेरमिली परिक्षेत्रांतर्गत चौडमपल्ली, आरेव्हा, कातमपल्ली, मुडझा व कोरेली या गावातील अंगणवाडी केंद्राच्या इमारती जिर्णावस्थेत आहेत. मात्र याकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे तोंडी तक्रार करूनही दखल घेण्यात आली नाही. जीर्णावस्थेत असलेल्या अंगणवाडी केंद्राच्या इमारतीची माहिती आरोग्य सेविकांनी बालविकास विभागाला दिली. मात्र संबंधित विभागाने याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले. आता पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहे. गेल्या दोन-तीन दिवसापासून जिल्हाभरात पाऊस सुरू आहे. यामुळे जीर्ण इमारती कोसळण्याची दाट शक्यता असते. यामुळे प्रशासनाने नियोजन करून पावसाळ्यापूर्वीच जीर्ण अंगणवाडी केंद्राच्या इमारती दुरूस्त करायला पाहिजेत, अशी मागणी होत होती. चौडमपल्ली येथे बुधवारी सकाळी अंगणवाडी केंद्र उघडण्यात आले असता, स्लॅबचे छत पडल्याचे दिसून आले. सरपंच व गावकऱ्यांनी या घटनेची पाहणी केली. या अंगणवाडी केंद्रातील सामान एका व्यक्तीच्या घरी हलवून तेथे अंगणवाडी भरविण्यात आली. गावकऱ्यांनी प्रशासनावर रोष व्यक्त केला आहे. सदर घटना दिवसा घडली असती तर यामध्ये एखादा बालक सापडला असता, मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही.