छतावरील पावसाच्या पाण्याचे नियोजन शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 11:36 PM2018-05-11T23:36:26+5:302018-05-11T23:36:26+5:30
छतावर पडणारे पावसाचे पाणी विहीर वा हातपंपाच्या माध्यमातून जमिनीत सोडल्यास हे पाणी वाहून न जाता भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यास मदत होते. तसेच ते साठवून देखील ठेवता येते.
राजेश भोजेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : छतावर पडणारे पावसाचे पाणी विहीर वा हातपंपाच्या माध्यमातून जमिनीत सोडल्यास हे पाणी वाहून न जाता भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यास मदत होते. तसेच ते साठवून देखील ठेवता येते. हा हेतू पुढे ठेवून खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा येथील वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांच्या किफायतशीर दरात अभ्यासाअंती विकसित केलेल्या तंत्रज्ञानाला भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या अहवालाअंती मान्यता प्रदान केली.
इतकेच नव्हे, या यंत्रणेचा वापर प्रधानमंत्री आवास योजना (शहरी व ग्रामीण) अंतर्गत विविध शहरे व गावांमध्ये बांधण्यात येणाऱ्या घरकूल योजनांमध्ये ज्या घरकूलधारकाकडून केला जाईल, त्यास ग्रामपंचायत, नगरपंचायत, महानगरपालिका क्षेत्रामध्ये घरपट्टी व मालमत्ता करात सवलत देण्याचा विचार करण्यात आला आहे. असे पत्र प्रधान सचिव (नगरविकास-१), प्रधान सचिव (नगरविकास) व अपर मुख्य सचिव (गृहनिर्माण) विभागाला मुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव यांच्यामार्फत गेलेले आहेत. मात्र याची अंमलबजावणी करण्याची तसदी एकाही स्थानिक स्वराज्य संस्थेने घेतल्याचे दिसत नाही. या बाबीला दीड-दोन वर्षांचा कालावधी लोटला आहे. उन्हाळा आला कागदोपत्री टंचाई आराखडा दाखविण्यातच धन्यता मानली जात असल्याचे चित्र आहे.
पाणी टंचाईच्या नावावर निधीचा अपव्यय
शासन, प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थाही जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्चून पाण्याचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करताना दिसून येते. मात्र अपेक्षित परिणाम बघायला मिळत नाही. समस्या उद्भवली की हातपाय हलवणे हाच प्रकार सुरू असतो. चंद्रपूर महानगराचेही असेच झाले आहे. दरवर्षी निधीचा चुराडा होतो. आणि दरवर्षी पाणी टंचाईची झळ सोसावी लागतेच.
वेळ मनपाच्या हातात
पावसाळा सुरू व्हायला केवळ एक महिना उरला आहे. या कालावधीत आणि पावसाळा संपेपर्यंत शहरातील मोठ्या ठिकाणी हा प्रयोग केला तरी पुढल्यावर्षी याचा फायदा अनुभवता येणे शक्य आहे. यासाठी मनपा प्रशासनाची पावसाचे पाणी नियोजनाबाबतची दृष्टी स्पष्ट असणे गरजेचे आहे.
रामाळातील जलसाठा ठरतोय उपयोगाचा
चंद्रपूर जिल्ह्यात सूर्याचा पारा ४७ अंशावर गेलेला आहे. दुसरीकडे इरई धरणातील जलसाठा अत्यल्प असल्यामुळे चंद्रपूरकरांना पाणी टंचाईशी दोन हात करावे लागत आहे. ज्यांच्याकडे विहीर वा हातपंप आहे, तेही तळ गाठत आहे. या परिस्थितीत केवळ रामाळा तलावामध्ये असलेल्या जलसाठ्यामुळे परिसरातील विहिरी वा हातपंपांना मुबलक पाणी आहे. एकूणच तलावाच्या माध्यमातून का होईना पाणी साठवून असल्याचा फायदा चंद्रपूरकरांना होत आहे. पाणी साठवण केल्यामुळे भूगर्भातील जलसाठा टिकून राहतो, हे कुणीही नाकारू शकत नाही.
‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’कडेही प्रशासनाची पाठ
चंद्रपूर जिल्ह्यात गरज असतानाही ‘रेन वॉटर हार्वेस्टिंंग’कडे महानगर पालिका आणि जिल्हा प्रशासनच पाठ फिरवत आहेत. चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणावर आणि टोलेजंग इमारतींचे बांधकाम बिनदिक्कतपणे करण्यात येत आहे. या बांधकामातही प्रशासनाकडून ‘रेन वॉटर हार्वेस्टिंंग’ची सक्ती होताना दिसत नाही.
पावसाचे पाणी शुद्ध करून साठवण
वर्धेचे बालरोग तज्ज्ञ डॉ. सचिन पावडे यांनी अभ्यासाअंती विकसित केलेल्या यंत्रणेच्या माध्यमातून पावसाच्या पाण्याचे नियोजन करता येते. ही यंत्रणा कोणत्याही स्लॅबच्या घरावर बसविणे सहज सोपे आहे. छतावर पडणारे पावसाचे पाणी या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शुद्ध करून विहिरीत सोडता येते. हातपंपाच्या पाईपमधूनही जमिनीत सोडता येते. यामुळे विहीर व हातपंपाच्या माध्यमातून या पाण्यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होते. अन्यथा पावसाचे पाणी छातावरून धो-धो खाली पडून नाली, नंतर मोठे नाले व त्यानंतर नदीद्वारे वाहून जाते. आणि पावसाळ्याच्या दिवसात जरी हातपंप व विहिरीला पाणी दिसत असले तरी पावसाळा संपल्यानंतर काही महिन्यातच ते खोल गेलेले बघायला मिळते. मग हे पावसाचे पाणी जर या तंत्रज्ञानाद्वारे जमिनीत मुरविले तर ते बराच कालावधीपर्यंत भूगर्भातील पाण्याची पातळी टिकवून ठेवते. त्यामुळे उन्हाळ्यातही या पाण्यामुळे बिकट पाणी टंचाई जाणवत नाही. या तंत्रज्ञानाचा चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायती, नगर पंचायती, नगर परिषदा व चंद्रपूर महानगर पालिकेने वापर करण्यास बाध्य केल्यास पुढच्या उन्ह्याळ्याची भीषणताही कमी करता येणे सहज शक्य आहे. मनपा प्रशासनाने खरेतर चंद्रपुरात पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्याची नितांत गरज आहे. चंद्रपुरातील प्रत्येक घराच्या छतावरील पावसाच्या पाण्याची या माध्यमातून साठवण करण्यासाठी जागृतीसाठी पुढाकार घेण्याची गरजही तेवढीच आहे.