छतावर जाळे, भिंतीवर पिचकाऱ्या
By admin | Published: January 14, 2015 11:04 PM2015-01-14T23:04:05+5:302015-01-14T23:04:05+5:30
शासनाचे अनेक पुरस्कार पटकावत ‘स्वच्छ भारत मिशन’च्या माध्यमातून जिल्हाभर स्वच्छतेचे धडे देत निघालेल्या जिल्हा परिषदेतच अस्वच्छता पसरली आहे. याकडे मात्र, अधिकारी,
मिनी मंत्रालय घाणीने बरबटले
मंगेश भांडेकर - चंद्रपूर
शासनाचे अनेक पुरस्कार पटकावत ‘स्वच्छ भारत मिशन’च्या माध्यमातून जिल्हाभर स्वच्छतेचे धडे देत निघालेल्या जिल्हा परिषदेतच अस्वच्छता पसरली आहे. याकडे मात्र, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्रास दुर्लक्ष होत असल्याने ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: मात्र कोरडे पाषाण’ असे म्हणण्याची पाळी आली आहे. जिल्हा परिषद इमारतीत लागलेले विविध पोस्टर, बॅनर, याद्या, व नागरिक, कर्मचाऱ्यांनी मारलेल्या पिचकाऱ्यांमुळे इमारतीला अवकळा आली आहे. इमारतीत प्रवेश करताच छतावर जाळे, भिंतीवर पिचकाऱ्या हे दृष्य पाहायला मिळते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद कर्मचारी गावागावात धावपळ करीत आहेत. शहरापासून तर खेळ्यांपर्यंत या अभियानाची जनजागृती सुरु असून परिसर स्वच्छ ठेवण्याचे धडे नागरिकांना दिले जात आहेत. मात्र, जिल्हा परिषद इमारतीतच अभियान राबविण्याचा विसर पडल्याने अभियानाचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून येते.
जिल्हा परिषद इमारतीत प्रवेश करताच दर्शनी भागावर नोटीस चिपकवलेली दिसतात. तर आत गेल्यावर वरच्या माळ्यावर चढताना पायऱ्या पिचकाऱ्यांनी रंगलेल्या आहेत. अस्वच्छता दूर करण्यासाठी पायऱ्यांवर टाईल्स लावण्यात आले. मात्र या टाईल्सही पिचकाऱ्यांनी रंगलेल्या आहेत. स्वच्छतागृहात प्रवेश करताच दुर्गंधीचा सामना करावा लागतो. या दुर्गंधीचा सामना नागरिकांना व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनाही सहन करावा लागत आहे. मात्र, स्वच्छता करणार कोण, असे म्हणत सर्वंच गप्प आहेत. जिल्हा परिषदेत सफाई कर्मचारी आहेत. मात्र, ते नेमकी कुठली स्वच्छता करतात, याचा थांगपत्ता लागत नाही. जिल्हा परिषद इमारतीत फेरफटका मारला असता, अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिग जमा करुन दिसले.
काही महत्वाच्या सूचना असल्यास प्रत्येक विभागात नोटीस बोर्डवर ती सूचना लावणे किंवा सूचना रजीस्टरवर नोंद करायची असते. मात्र, जिल्हा परिषद इमारतीत प्रत्येक विभागाच्या प्रवेशद्वारावर सूचना लिहलेली कागदे चिपकवण्यात आली आहेत. त्यामुळे भिंतीचा रंग दिसत नाही.
कर्मचाऱ्यांच्या वेळा, शासकीय योजनांची माहिती, निवड यादी अशा विविध कागद, पोस्टरर्सनी भिंती रंगलेल्या आहेत. अधिकारी सरळ आपल्या कक्षात जाऊन बसतात. त्यांच्या कक्षासमोरील परिसराची नियमीत स्वच्छता केली जाते. मात्र, इतर विभागात गेले तर अस्वच्छता दिसून येते. याचा त्रास कर्मचारी व नागरिकांना सहन करावा लागत आहे.