गुणवंताचे आयुष्य जिल्हाधिकारी करणार ‘रोषण’

By admin | Published: June 19, 2014 11:46 PM2014-06-19T23:46:12+5:302014-06-19T23:46:12+5:30

परिस्थितीवर मात करून दहाव्या वर्गात दैदिप्यमान यश संपादन करणाऱ्या गुणवंतांचे आयुष्य चंद्रपूरचे जिल्हाधिकारी रोषण करणार आहेत.

"Roshna" | गुणवंताचे आयुष्य जिल्हाधिकारी करणार ‘रोषण’

गुणवंताचे आयुष्य जिल्हाधिकारी करणार ‘रोषण’

Next

चंद्रपूर : परिस्थितीवर मात करून दहाव्या वर्गात दैदिप्यमान यश संपादन करणाऱ्या गुणवंतांचे आयुष्य चंद्रपूरचे जिल्हाधिकारी रोषण करणार आहेत.
अतिशय गरीबीत राहुनही १० वीच्या परिक्षेत ८८.४० टक्के गुण मिळवून तू गुणवत्ता सिद्ध केली आहेस. तुझ्या पुढील शिक्षणाच्या आड गरीबी येणार नाही. तुझ्या शिक्षणाचा खर्च आम्ही करणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैस यांनी मुरसा (घुग्घूस) येथील रोशना रामदास कामतवार या १० वीतील गुणवंत विद्यार्थीनीस सांगितले अन् जिल्हाधिकाऱ्यांच्या या आश्वस्थ उद्गाराने रोशना अक्षरश: हरखून गेली.
गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात रोशना व तिच्या कुटुंबियांना बोलावून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. तिच्या यशाचे कौतुक करताना जिल्हाधिकारी म्हणाले, हे यश वाखाणण्याजोगे असून यापुढेही असेच यश मिळवित रहा. पुढील शिक्षणाबद्दल विचारले असता, विज्ञान शाखेतून शिक्षण घेण्याची ईच्छा तिने व्यक्त केली. मात्र गरीबीमुळे हे शक्य नसल्याचे रोशनाने सांगताच, जिल्हाधिकारी डॉ.म्हैसकर यांनी तू विज्ञान शाखेतच प्रवेश घे. तुझ्या शिक्षणाचा खर्च आम्ही करू, असे आश्वासन दिले. चंद्रपूर येथील शासकीय वसतीगृहात राहून शिक्षण घेण्याची ईच्छा असल्यास तशी व्यवस्थाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले. सोबतच शिक्षणासाठी लागणारी सर्व कागदपत्रे तात्काळ करुन देण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी तहसिलदार गणेश शिंदे यांना दिले.
घुग्घूसवरून चार किलोमिटर अंतरावरील मुरसा या खेड्यात वास्तव्याला असलेली रोशना तीन भावंडात सर्वांत लहान असून ती येथील डॉ.आंबेडकर विद्यालयाची विद्यार्थीनी आहे. या वर्षीच्या दहावीच्या परिक्षेत ८८.४० टक्के गुण प्राप्त करून तिने घवघवीत यश संपादन केले आहे.
गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर प्रतिक्रीया देताना ती म्हणाली, माझेही मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न असून जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रोत्साहनाने मोठे बळ मिळाले आहे. आता विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याचे स्वप्न साकार होणार असल्याचा आनंद तिने व्यक्त केला. यावेळी तिच्या समवेत तिची आई व मोठी बहिण उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: "Roshna"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.