दालमिया सिमेंट कंपनीतील मृत कामगाराच्या कुटुंबाला १६ लाख रुपये व दोन नोकऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:19 AM2021-07-02T04:19:37+5:302021-07-02T04:19:37+5:30
कोरपना : तालुक्यातील नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनीत ई.एस.पी. इमारतीवर काम करीत असताना दुसऱ्या मजल्यावरून पडून कंत्राटी कामगाराचा मृत्यू ...
कोरपना : तालुक्यातील नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनीत ई.एस.पी. इमारतीवर काम करीत असताना दुसऱ्या मजल्यावरून पडून कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. रात्री १० वाजेपर्यंत कामगार व कंपनी संघर्ष सुरू होता. अखेर कंपनीने मृत कामगारांच्या कुटुंबाला १६ लाख रुपये व दोन नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला.
संतोष रामअचल चव्हाण (२८), रा. नांदा फाटा असे मृत कामगाराचे नाव असून ई.एस.पी. इमारतीहून अचानक खाली पडल्याने त्याला तात्काळ गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच दालमिया सिमेंट कंपनीतील सर्व कामगार संघटनेचे पदाधिकारी व कामगारांनी मृतक कामगाराच्या परिवाराला न्याय मिळावा, यासाठी कंपनीचे काम बंद केले व गडचांदूर ग्रामीण रुग्णालयामध्ये डेरा दाखल केला. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका कामगारांनी घेतली. दालमिया कंपनीचे व्यवस्थापनाचे पदाधिकारीसुद्धा रुग्णालयात पोहोचले. मृतकाचा कुटुंबातील सदस्याला कंपनीत स्थायी नोकरी व आर्थिक साहाय्य देण्याची मागणी कामगार संघटनांनी केली; परंतु व्यवस्थापनाच्या ताठर भूमिकेमुळे मागणी मान्य होत नव्हत्या. कामगार संघटना व राजकीय कार्यकर्त्यांनी रुग्णालयासमोर ठिय्या मांडला. तब्बल सहा तासांचा वाटाघाटीनंतर अखेर मागण्या मान्य झाल्या.
कंपनी व्यवस्थापनाने मृतकाच्या कुटुंबातील दोन सदस्यांना नोकऱ्या व १६ लाख रुपये देण्याचे मान्य केल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले. मृतकाच्या कुटुंबाला कंपनीकडून १६ लाख व विमा कंपन्यांकडून सहा लाख अशी एकूण २२ लाख रुपये रक्कम मिळणार आहे.
बॉक्स
एसडीपीओंची मध्यस्थी
कंपनी व्यवस्थापन व कामगारांचा संघर्ष शिगेला पोहोचला असताना तब्बल सहा तास उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी व्यवस्थापन व कामगारांची बाजू एकमेकांसमोर मांडली. कामगारांच्या मागण्या मान्य करण्यासाठी कंपनी व्यवस्थापनाला त्यांनी विनंती केली आणि कंपनी व कामगार संघर्ष मिटविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.