ट्रॅव्हल्सकडून आरटीओ नियमांची पायमल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 06:00 AM2019-11-14T06:00:00+5:302019-11-14T06:00:42+5:30
या पथकाकडून अशा ट्रॅव्हल्सचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाईचे संकेत येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वांभर शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात आजघडीला २६९ खासगी ट्रॅव्हल्स धावत आहेत. या ट्रॅव्हल्स चंद्रपूर ते नागपूर, चिमूर व गडचिरोली या मार्गाने प्रवासी वाहतुक करतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सकडून आरटीओच्या नियमांची पायमल्ली होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या ट्रॅव्हल्सना नियमात आणण्यासाठी चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी राज्य परिवहन महामंडळाला सोबत घेऊन भरारी पथक नेमले आहे. या पथकाकडून अशा ट्रॅव्हल्सचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाईचे संकेत येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वांभर शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात आजघडीला २६९ खासगी ट्रॅव्हल्स धावत आहेत. या ट्रॅव्हल्स चंद्रपूर ते नागपूर, चिमूर व गडचिरोली या मार्गाने प्रवासी वाहतुक करतात. पैकी अनेक ट्रॅव्हल्सधारकांनी अद्यापही कर भरलेला नाही. अनेकांजवळ फिटनेस प्रमाणपत्रदेखील नाही. काहींकडे परमीटच नाही तर अनेकांनी मुदत संपल्यानंतरही विमा उतरविला नसल्याची बाब पुढे आली आहे.
याशिवाय काही ट्रॅव्हल्समधून दारूची तस्करी करण्यात येत असल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत. अशा ट्रॅव्हल्सचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात येणार आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
ट्रॅव्हल्समधून दारूची तस्करी
काही महिन्यांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात पोलिसांनी एका नामांकित ट्रॅव्हल्समधून दारू जप्त केली होती. मात्र नंतर त्या ट्रॅव्हल्सला सोडून देण्यात आले होते. अशाच प्रकारे काही ट्रॅव्हल्सच्यामार्फत दारू तस्करीसह अवैध व्यवसायसुद्धा होत असल्याची तक्रार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाली आहे. परंतु याबाबतच्या कारवाईचे अधिकार पोलीस प्रशासनाला असल्याचे समजते.