बिनधास्तपणे काढली जाते गुळाची दारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 11:21 PM2017-10-30T23:21:45+5:302017-10-30T23:22:08+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू झाली आहे. असे असतानाही जिवती तालुक्यातील मुकादमगुडा, घटकरगुडा नाल्यावर खुलेआम हातभट्टी लाऊन दारू काढली जात असल्याचे ‘लोकमत’ ने आज सोमवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उजेडात आले आहे.
शंकर चव्हाण / संघरक्षित तावाडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू झाली आहे. असे असतानाही जिवती तालुक्यातील मुकादमगुडा, घटकरगुडा नाल्यावर खुलेआम हातभट्टी लाऊन दारू काढली जात असल्याचे ‘लोकमत’ ने आज सोमवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उजेडात आले आहे. ही दारू नंतर परिसरातील गावागावात विक्रीसाठी पोहोचवली जाते.
दारूच्या व्यसनापायी अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे. युवा वर्गात या व्यसनाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्यात दारूबंदी झाली. मात्र पोलिसांकडून त्याची अंमलबजावणी पाहिजे तशी केली जात नाही. तालुक्यातील मुकादमगुडा व घटकरगुडा येथे प्रस्तुत प्रतिनिधींनी स्टिंग आॅपरेशन केले असता नाल्यावर खुलेआम चूल पेटवून दारू काढली जात असल्याचे दिसून आले. या दारूची परिसरातील गावात वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली.
फोनवर मिळते घरपोच सेवा
पहाडावरील कुंभेझरी, जिवती, परमडोली अशा काही गावात फोन केल्यानंतर घरपोच दारू पुरवठ्याची व्यवस्था केली जात असल्याची माहिती काही नागरिकांकडून ऐकायला मिळाली.
पोलिसांची गस्त फक्त नावापुरतीच
परमडोली, मुकादमगुडा, ठक्करगुळा परिसरात वणी (बु) पोलिसाकडून गस्त केली जाते. ती फक्त नावापुरती दाखवून गावात वचक निर्माण करायचा आणि नंतर हातभट्टी व्यवसायाकडून हप्ता जमवायचा, असा प्रकार वणी (बु) पोलीस कॅम्पमधील एका पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती आहे.
ज्वारी, रासायनिक खत व कीटकनाशकाचा वापर
मोहफुलाची आणि गुळाची दारू सहजपणे गावागावात मिळत असली तरी जास्त नशा आणण्यासाठी त्यात ज्वारी, रासायनिक खत व कीटकनाशक असे घातक पदार्थ वापरत आहेत. लोकांना कमी पैशात अधिक नशा या दारूने येत असली तरी ही दारू विषापेक्षाही घातक आहे.