पुन्हा बँकांच्या एटीएममध्ये खडखडाट

By admin | Published: May 12, 2017 02:10 AM2017-05-12T02:10:16+5:302017-05-12T02:10:16+5:30

चार लाख लोकसंख्येच्या आणि औद्योगिकदृष्ट्या पुढारलेल्या चंद्रपूर शहरातील बँकांच्या एटीएममधून रोख रक्कम मिळत नसल्याने नागरिक हैराण आहेत.

Ruckus again at bank ATM | पुन्हा बँकांच्या एटीएममध्ये खडखडाट

पुन्हा बँकांच्या एटीएममध्ये खडखडाट

Next

नागरिक हैराण : ग्रामीण भागात बिकट परिस्थिती
चंद्रपूर : चार लाख लोकसंख्येच्या आणि औद्योगिकदृष्ट्या पुढारलेल्या चंद्रपूर शहरातील बँकांच्या एटीएममधून रोख रक्कम मिळत नसल्याने नागरिक हैराण आहेत. त्रासलेले नागरिक बुधवारी बुद्धजयंतीची सुटी असल्याने कोणाकडे तक्रारही नोंदवू शकत नव्हते. चंद्रपूर शहराप्रमाणे ग्रामीण भागातील बँकांमध्ये आणखीही बिकट परिस्तिथी आहे.
चंद्रपुरात स्टेट बँक आॅफ इंडियाचे पाच एटीएम आहेत. बँक आॅफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक आदीचेही एटीएम कार्यरत आहेत. तसेच जवळच्या पडोली येथेही एक एटीएम आहे. परंतु बुधवार या सुटीच्या दिवशी शहरात वेगवेगळ्या एटीएमवर फिरूनही रोख रक्कम मिळाली नाही. नागरिकांना एसबीआयच्या मुख्य शाखेच्या एटीएममध्येच तेवढी रक्कम मिळाली. या एटीएमवर रक्कम मिळत असल्याने तेथे नागरिकांनी पैसे काढण्यासाठी दिवसभर गर्दी केली होती. उशिरा रात्रीपर्यंत तेथे पैसे काढण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या.
नोटबंदी लागू झाल्यापासून चंद्रपूर शहरात रोख रकमेचा तुटवडा सुरू झाला आहे. मधल्या दोन महिन्यात व्यवहार सुरळीत झाले, असे वाटत असताना पुन्हा गेल्या आठवड््यापासून एटीएम केंद्र ‘आऊट आॅफ कॅश’ दाखविले जात आहेत. बँक आॅफ इंडियाचे एटीएम कायम ‘आऊट आॅफ कॅश’ अशी पाटी काचेच्या प्रवेशद्वारावर मिरवित असते. त्याबाबत बँकेचे अधिकारीही व्यवस्थित उत्तर देत नाहीत. त्याचा नागरिकांना मोठा मन:स्ताप सहन करावा लागतो.

पाटण येथे बँकेत मनमानी
पाटण : जिवती तालुक्यात एकमेव भारतीय स्टेट बँकेची शाखा पाटण येथे आहे पूर्ण तालुक्याचा व्यवहार याच बँकेतून चालतो. तीन ते चार दिवस बँक बंद होती. बँकेचे व्यवहार बंद होते. बँक व्यवस्थापकांनी एटीएमची किल्ली सोबत नेल्याने व ते बँकेत न आल्याने ग्राहकांची तारांबड उडाली. त्यामुळे ग्राहकांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. कुणाला दवाखाना तर कुणाला लग्नासाठी पैसे काढायचे होते.

रकमेअभावी बँका कोरडया
जिवती : जिवती ठिकाण हे तालुक्याचे असून येथे एकही राष्ट्रीयकृत बँका नाहीत. कोकण-वैनगंगा ग्रामीण बँक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अशा दोनच बँका असून याही बँकात पैसे राहत नसल्याने तालुक्यातील जनतेला हैराण व्हावे लागत आहे. रक्कमेअभावी येथील बँकाच कोरड्या आहेत म्हणण्याची पाळी आली आहे. अनेक वर्षापासून जिवती येथे स्टेट बँकेची मागणी रेटून असली तरी या मागणीकडे संबंधीत विभाग व लोकप्रतिनिधीचे नेहमीच दुर्लक्ष होत आहे. खेड्यापाड्यातील नागरिकांना नेहमीच हात हलवित परत जावे लागते. सर्व तालुक्याचे व्यवहार या बँकेत जास्तच असून रक्कम मात्र पुरेशी राहात नाही. एखाद्या ग्राहकाने बँकेतील कर्मचाऱ्यांना पैशा बाबतीत विचारणा केली तर अर्वाच्च भाषेत उत्तर दिले जाते. अनेकदा तर बँकेत पैसे असले तर सामान्य नागरिकांना बँकेत पैसे नसल्याचे सांगत तेच पैसे सावकार लोकांना चुपचाप देत असल्याचेही बोंब आहे.
 

Web Title: Ruckus again at bank ATM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.