शाळा व्यवस्थापन समितीशी मुख्याध्यापकाचे असभ्य वर्तन
By admin | Published: July 12, 2014 01:02 AM2014-07-12T01:02:44+5:302014-07-12T01:02:44+5:30
राजोली येथील जि.प. शाळेचे मुख्याध्यापक तेथील शाळा व्यवस्थापन समितीशी बेजबाबदारपणाचे वर्तन करीत असून त्यांच्या मनमानी कारभाराची..
नागभीड : राजोली येथील जि.प. शाळेचे मुख्याध्यापक तेथील शाळा व्यवस्थापन समितीशी बेजबाबदारपणाचे वर्तन करीत असून त्यांच्या मनमानी कारभाराची व शालेय पोषण आहाराची चौकशी करावी, अशी मागणी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
राजोली (बोंड) येथे चौथ्या वर्गापर्यंत शिक्षणाची सोय असून बी.जी. खोब्रागडे हे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. नवीन सत्राची सुरूवात होऊन १० ते १२ दिवसांचा कालावधी होत असला तरी या शाळेत अद्यापही माध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आली नाही. शाळा व्यवस्थापन समितीच्या एखाद्या सदस्याने व्यवस्थापन समितीची बैठक घ्या, अशी मागणी केली तर उर्मटपणे उत्तर देवून सभा घेण्यास नेहमीच टाळाटाळ करतात, असा आरोप आहे.
शालेय पोषण आहारासंदर्भात शासनाने एक परिपत्रक जारी केले आहे. मुख्याध्यापकाने या परिपत्रकाप्रमाणे नोटीस काढायला पाहीजे होती. पण मात्र नोटीस काढलीच नाही. यासंदर्भात विचारणा केली असता बचत गटांना काम देण्यासंदर्भात तारखेचा उल्लेख नसलेली नोटीस लावण्यात आली आणि त्यावरील ३० जूनला नोटीस काढून २ जुलैपर्यंत अर्ज करण्याची मर्यादा घालून देण्यात आली आणि आपल्या निष्काळजीपणाचा परिचय मुख्याध्यापकांनी दिला. (तालुका प्रतिनिधी)