सत्ताधारी-विरोधकांत जुंपली
By admin | Published: May 3, 2017 12:46 AM2017-05-03T00:46:39+5:302017-05-03T00:46:39+5:30
जिल्हा परिषदेत सर्व लेखा शिर्षकाअंतर्गत २०१६-१७ मध्ये प्राप्त निधीच्या खर्चाचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी विशेष सभा घेण्यात आली.
जिल्हा परिषदेची सभा : उडवाउडवीच्या उत्तराने विरोधकांचा सभात्याग
चंद्रपूर : जिल्हा परिषदेत सर्व लेखा शिर्षकाअंतर्गत २०१६-१७ मध्ये प्राप्त निधीच्या खर्चाचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी विशेष सभा घेण्यात आली. सभेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनी केलेल्या खर्चाचा हिशेब घेतला. मात्र, खर्चाचा ताळमेळ न जुळल्याने सत्ताधारी-विरोधकांत चांगलीच जुंपली. सत्ताधारी उत्तर देऊ न शकल्याने सत्ताधाऱ्यांच्याविरोधात घोषणा देत विरोधकांनी सभागृहातून बहिर्गमन करीत निषेध नोंदविला.
२०१६-१७ या आर्थिक वर्षात सर्व लेखा शिर्षकांतर्गत प्राप्त निधीच्या खर्चाचा आढावा घेण्यासाठी विशेष सभा बोलाविण्याची मागणी काँग्रेसचे गटनेते डॉ. सतीश वारजुकर यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्याकडे केली होती. विरोधकांच्या मागणीनुसार भोंगळे यांनी तब्बल २७ दिवसानंतर मंगळवारी विशेष सभा बोलावली होती. जिल्हा परिषदेच्या सभगाृहात दुपारी १ वाजता सभेला सुरुवात झाली.
यावेळी विरोधकांनी सर्व लेखा शिर्षकांतर्गत प्राप्त निधीच्या खर्चाचा आढावा देण्याची मागणी केली. परंतु सत्ताधाऱ्यांनी केवळ अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेल्या निधीच्या खर्चाचा आढावा दिला. यामुळे विरोधी सदस्यांचे समाधान झाले नाही. त्यानंतर पाणी पुरवठा विषयावरुन चांगलेच वादळ उठले. १३ कोटी ५३ लाख १५ हजार रुपयांची तरतूद पाणी पुरवठ्यासाठी करण्यात आली होती मात्र या कामासाठी १४ कोटी २२ लाख ३४ हजार ५२५ रुपये खर्च झाले आहेत. सत्ताधाऱ्यांनी कंत्राटदारांची देयके काढण्यासाठी ६९ लाख १९ हजार ४२४ रुपयांचा अतिरिक्त खर्च केल्याचा आरोप काँग्रेस गटनेता डॉ. सतीश वारजुकर यांनी केला.
त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी या विषयावर समाधानकारक उत्तरे देण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे काँग्रेसच्या २० जिल्हा परिषद सदस्यांसह चार पंचायत समिती सभापतींनी सत्ताधाऱ्यांच्या निषेधार्थ घोषणा देत सभागृहातून बहिर्गमन केले.
सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, मुख्य कार्यपालन अधिकारी पापळकर, अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी अशोक शिरसे यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
सत्ताधारी केवळ हारतुरे घेण्यात व्यस्त : वारजूकर
स्वच्छ भारत मिशनअंतर्गत प्रत्येक गावात शौचालय बांधकामाची मोहीम सुरु आहे. मात्र अनेक गावांतील कामे अपूर्ण आहेत. शेकडो लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम देण्यात आलेली नाही. त्यामुळे लाभार्थी आर्थिक चटके सोसत असताना जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे मात्र ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते हारतुरे घेण्यात धन्यता मानत असल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेता डॉ. सतिश वारजूकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
जिल्ह्यातील अनेक गावे हागणदारीमुक्त झाल्याचे दाखवून जिल्हा परिषद प्रशासनाकडून आपला गवगवा केला जात आहे. आजघडीला अनेक गावात शौचालय बांधकाम सुरु आहेत. परंतु ही गावे हागणदारीमुक्त झाल्याचे दाखविण्यात आले आहे. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा २९ एप्रिलला पार पडला. मात्र, गतवर्षी बेसलाईन आणि रोहयो अंतर्गत बांधण्यात आलेली अनेक शौचालये अपूर्ण आहेत. तसेच रोहयोच्या माध्यमातून बांधकाम साहित्य खरेदीसाठी खर्च करण्यात आलेले १५ कोटी ८८ लाख ८८ हजार रुपये, १ कोटी ३२ लाख २ हजार रुपयांची मजुरीची रक्कम देण्यात आलेली नाही. तसेच या वर्षातील एक कोटी ५६ लाख १५ हजार रुपयांची मजुरीची रक्कम देण्यात आलेली नाही. परंतु जिल्हा परिषद प्रशासन सत्काराचा महोत्सव घेण्यात धन्यता मानत आहे. वित्त व लेखाधिकारी अनेक कामांची बिले काढण्यास दिरंगाई करतात असा आरोप डॉ. वारजुकर यांनी यावेळी केला. यावेळी प्रा. राजेश कांबळे, डॉ. आसावरी देवतळे, गजानन बुटके, रमाकांत लाधे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती उपस्थित होते.