कोरोना उद्रेक टाळण्यासाठी रूणालय, केअर सेंटर होताहेत अपडेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 05:00 AM2021-02-22T05:00:00+5:302021-02-22T05:00:42+5:30
कोरोना संसर्गावर नियंत्रण करणे व प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, सर्व नगर परिषदेचे मुख्याधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व कार्यालय प्रमुख व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढू लागल्याने केव्हाही उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संभाव्य उपाययोजना म्हणून कोविड रुग्णालय, कोविड केअर सेंटर व यापूर्वी वापरात आलेल्या इमारतींची तपासणी करून सुविधा अपडेट करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले. कोरोना रुग्णांसाठी आवश्यक साहित्य कुठल्याही क्षणी वापरता येतील, अशास्थितीत आणून ठेवण्याची कार्यवाही सोमवारपासून (दि. २२) सुरू होणार आहे.
कोरोना संसर्गावर नियंत्रण करणे व प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, सर्व नगर परिषदेचे मुख्याधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व कार्यालय प्रमुख व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत.
जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टरांचा नियमित आढावा घेऊन त्यांच्याकडे उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची माहिती घेऊन त्यापैकी संशयितांची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे.
खासगी रुग्णालयांना नियमित भेटी देणे, सौम्य व अतिसौम्य लक्षणे असलेल्या बाधित किंवा संशयित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींनी गृह विलगीकरण व अलगीकरणाची परवानगी घेऊन नियमांचे पालन केले जाते किंवा नाही, याचीही तपासणी सोमवारपासून सुरू केली जाणार आहे. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासन तयारी करीत आहे.
मंगल कार्यालयातील कार्यक्रमांवर पोलिसांचा वाॅच
वरोरा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. परवानगीमध्ये नमूद संख्येपेक्षा अधिक उपस्थिती असल्याचे विवाह सोहळ्यात दिसून येत आहे. यामुळे मंगल कार्यालयात होणाऱ्या कार्यक्रमांवर वाॅच ठेवण्याकरिता पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक नेमण्यात आले आहे. हे पथक आयोजक व मंगल कार्यालय संचालक यांच्यावर तात्काळ कारवाई करणार आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता टाळेबंदी करण्यात आली होती. कोरोनाचा प्रभाव कमी होताच टाळेबंदी शिथिल करीत मालवाहतूक, प्रवासी वाहतूक, शाळा महाविद्यालय, जलतरण तलाव, व्यायाम शाळा व मंगल कार्यालये सुरू करण्यात आले. यामुळे स्थिती पूर्वपदावर होऊ लागली. मात्र पुन्हा कोरोनाने डोके वर काढले.
पाचपेक्षा जास्त ग्राहकांवर बंदी
भाजीपाला मार्केट, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल, सर्व दुकानदार, कर्मचारी व विक्रेत्यांना मास्क लावणे बंधनकारक आहे. दुकानाच्या प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर उपलब्ध नसल्यास आणि एकावेळी केवळ पाचपेक्षा जास्त ग्राहक असल्यास कारवाई होणार आहे.
अन्यथा कारवाईचा बडगा
शासकीय कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाला मास्क लावणे बंधनकारक आहे. त्यामुळे सर्वांनी मास्क वापरावा, हात स्वच्छ करण्यासाठी साबण व सॅनिटायझर वापरावे, मास्कचा वापर न करणाऱ्यांवर पोलीस व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या फिरत्या पथकाकडून दंड आकारणी आकारण्यात येईल, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
२४ तासात २९ कोरोना रुग्णांची भर
जिल्ह्यात २४ तासात २९ कोरोना रुग्ण आढळले तर उपचारानंतर २२ जणांना सुटी देण्यात आली. सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १२९ असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत बाधितांची संख्या २३ हजार ३६८ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ८४३ झाली आहे. दोन लाख नऊ हजार ४२२ नमुन्यांची तपासणी झाली.