टाळेबंदीतही ग्रामीण कोरोना समित्या हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:20 AM2021-04-29T04:20:33+5:302021-04-29T04:20:33+5:30
मासळ बु : शहरासह ग्रामीण भागात कोरोनाने पायंडा रोवला आहे. अनेक नागरिक कोरोनाचे शिकार होत आहे. परिसरात किंवा गावात ...
मासळ बु : शहरासह ग्रामीण भागात कोरोनाने पायंडा रोवला आहे. अनेक नागरिक कोरोनाचे शिकार होत आहे. परिसरात किंवा गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी यांनी ग्रामीण भागातील ग्रामपंचायत स्तरावर कोरोना ग्राम निर्मूलन संघर्ष समितीची स्थापना करण्याचे आदेश काढले. गाव-खेड्यात समित्या स्थापन झाल्या. गावात ये-जा करणाऱ्या व्यक्तीवर समित्या नजर ठेवून त्यांचे विलगीकरण देखरेख करीत आहे. मात्र, हल्ली टाळेबंदीत गावकऱ्यांच्या सहकार्याच्या अभावामुळे ग्रामीण भागात कोरोना ग्राम ॲम्बुलन्स समित्या हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
कोरोनाची पहिली लाट येऊन एक वर्षाचा कालावधी झाला. कोरोना विषाणूची दुसरी लाट सुरू आहे. अनेक नागरिक सर्दी, ताप, खोकला या आजाराने ग्रस्त आहेत. टाळेबंदीमुळे अनेक नागरिकांनी गावाचा रस्ता धरला आहे. यामुळे गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, यासाठी ग्रामपंचायतीने गाव स्तरावर कोरोना ग्राम निर्मूलन समितीची स्थापना केली. या समितीमध्ये सरपंच ग्रामसेवक, तलाठी, आरोग्यसेवक, ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिकांचा समावेश आहे. गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी ही समिती बाहेरून येणाऱ्या नवीन व्यक्तीवर नजर ठेवते. गावबंदीची प्रभावी अंमलबजावणी व त्यांच्या वैद्यकीय चाचणीसह विलगीकरणाची व्यवस्था करत देखरेख व औषध उपचार करते. त्यानुसार, कोरोना निर्मूलन समिती आपले कार्य पार पाडत आहे.
बॉक्स
गावकरी लपवितात माहिती
नजर चुकीने गावात नविन व्यक्ती आला, तर त्याची कल्पना गावातील कुटुंबाच्या प्रमुखाने समितीला देण्याची जबाबदारी आहे. असे असताना मात्र गावकऱ्यांकडून अशी माहिती लपविली जाते. त्यामुळे गाव खेड्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याचे प्रमाण जास्त आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाची अवहेलना गावकरी करीत आहे. त्यामुळे गावबंदीची अंमलबजावणी ग्रामस्तरावर होताना दिसून येत नाही.
पोलीस प्रशासन गावातील चौरस्तावर सजग पहारा देत असले, तरी गावात येणारा व्यक्ती चोर पावलांनी आड मार्गाने येत असतो व गावात मुक्त संचार करीत असतो. अशा वातावरणामुळे ग्रामीण भागातील कोरोना निर्मूलन समिती हतबल झाल्या आहेत.
बाॅक्स
आरोग्य कर्मचाऱ्यांचे अपडाऊन
प्राथमिक आरोग्य केंद्र मासळ बु. अंतर्गत परिसरातील अनेक गाव येत असतात. अनेक गावात गृहविलगीकरणात असलेले कोविड रुग्ण आहेत. मात्र, अशाही परिस्थितीत आरोग्य विभागाचेच कर्मचारी तालुक्याच्या ठिकाणावरून अपडाऊन करीत असतात. स्थानिक पातळीवर एकही कर्मचारी राहत नाही. परिसरात कोरोनाचे सौम्य लक्षण असणाऱ्या रुग्णाकडे दुर्लक्ष होत आहे.