सायखेडा गावात तापाची साथ
By admin | Published: June 3, 2014 11:59 PM2014-06-03T23:59:03+5:302014-06-03T23:59:03+5:30
सावली तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या सायखेडा गावात मागील १५ दिवसांपासून तापाची साथ पसरली आहे. संपूर्ण गावच तापाने फणफणत असून अद्यापही आरोग्य यंत्रणा या गावात पोहचली नाही.
चंद्रपूर : सावली तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या सायखेडा गावात मागील १५ दिवसांपासून तापाची साथ पसरली आहे. संपूर्ण गावच तापाने फणफणत असून अद्यापही आरोग्य यंत्रणा या गावात पोहचली नाही. त्यात वैद्यकीय अधिकार्यांचा संप सुरू असल्याने बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. या गावात आरोग्य शिबिर सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष खुशाल लोढे यांनी एका निवेदनातून केली आहे.
घरातील एका व्यक्तीला ताप आल्यानंतर कुटुंबातील सर्वच सदस्यांना तापाची लागण होते. तीन ते चार दिवस अंगात ताप राहिल्यानंतर रुग्णाला प्रचंड अशक्तपणा येतो. त्यानंतर त्याला उलट्या होणे सुरू होते. असा प्रकार गेल्या १५ दिवसांपासून या गावात सुरू आहे. असे असले तरी अद्यापही आरोग्य यंत्रणेने या गावात आपली चमू पाठविली नाही. गावात कमालिची अस्वच्छता असून याकडे स्थानिक ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. गावातील सांडपाणी वाहून नेणार्या नाल्या अद्यापही तुंबून आहेत. गावात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे. यातूनच असे आजार बळावत असल्याचा आरोप लोडे यांनी निवेदनातून केला आहे.
काही ग्रामपंचायत सदस्यांनी स्वत:च ठेकेदारी सुरू केल्याने गावातील विकासाकडे व नागरिकांच्या समस्यांकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी गावकर्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे लोडे यांनी निवेदनात म्हटले आहे. १५ दिवसांपूर्वी याच गावातील एका बालकाला चंद्रपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला डेंग्यू झाल्याचे निदान झाले होते. (प्रतिनिधी)