सचिन तेंडुलकरने पाहिल्या जुनाबाईच्या तीन पिढ्या; व्हिडीओही सोशल मीडियावर केला शेअर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 07:39 AM2024-01-26T07:39:54+5:302024-01-26T07:40:12+5:30
सचिनने ताडोबातील जुनाबाई वाघिणीच्या तीन पिढ्या पाहिल्याचे मोठ्या अभिमानाने सोशल मीडियावर ट्वीट केले आहे.
- राजकुमार चुनारकर
चिमूर (जि. चंद्रपूर) : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील जुनाबाई वाघीण मागील अनेक वर्षांपासून पर्यटकांना आकर्षित करीत आहे. त्यात जुनाबाई वाघिणीने प्रसिद्ध क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना चांगलीच भुरळ घातली आहे. सचिनने ताडोबातील जुनाबाई वाघिणीच्या तीन पिढ्या पाहिल्याचे मोठ्या अभिमानाने सोशल मीडियावर ट्वीट केले आहे. जुनाबाईने आजपर्यंत कंकाजरी मेल, मोठा मटका, ताला, दागोबा व आजघडीला झायलो मेलसोबत संबंध स्थापित केला आहे. याच परिसरात असलेली तिची मुलगी वीरा या वाघिणीलाही झायलो वाघाचे दोन बछडे आहेत.
Celebrating National Tourism Day with a roar!
— Sachin Tendulkar (@sachin_rt) January 25, 2024
In Tadoba, I have seen 3 generations of tigers - Junabai, her cub Veera, and then recently Veera’s cubs. It’s a surreal experience! 🐅
With community participation and responsible tourism, there are many places to explore in India.… pic.twitter.com/OYqpnvU0p4
असे पडले जुनाबाईचे नाव; १७ बछड्यांची आई
चिमूर तालुक्यातील मदनापूर बफर झोन परिसरात वास्तव्यास असलेली जुनाबाई वाघिणीने आजपर्यंत १७ बछड्यांना जन्म दिला आहे. त्यापैकी काही जगले, तर काही मृत झाले आहेत. मदनापूर जंगलात असलेल्या जुनाबाई नावाच्या मंदिर परिसरात या वाघिणीचे वास्तव्य असल्याने वन्यजीवप्रेमींनी तिला ‘जुनाबाई’ नाव दिले व ती याच नावाने प्रसिद्ध आहे.