समृद्ध गाव विकासासाठी ‘साद माणुसकीची’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 11:42 PM2018-04-02T23:42:29+5:302018-04-02T23:42:29+5:30
एक वर्षापूर्वी कोठारी केंद्रातील सहा जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना २० लाख रुपयांचे संगणक संच पुरविण्यात आले. प्रत्येक शाळेतील शौचालय दुरुस्ती करून स्वच्छ करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठारी : एक वर्षापूर्वी कोठारी केंद्रातील सहा जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना २० लाख रुपयांचे संगणक संच पुरविण्यात आले. प्रत्येक शाळेतील शौचालय दुरुस्ती करून स्वच्छ करण्यात आले. केंद्रातील शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. यात तज्ज्ञांकडून शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले. खेड्यात जन्मलेल्या आणि शिक्षण घेवून वैभव संपन्न झालेल्यांना एकत्रित करुन त्यांचा आर्थिक हातभार गावाच्या विकासासाठी लागावा यासाठी साद माणुसकीद्वारे प्रयत्न सुरू आहेत. त्याचा पहिला प्रयोग कोठारीत करण्यात आल्याचे प्रतिपादन साद माणुसकीची फाऊंडेशनचे हरिश बुटले यांनी केले.
कोठारी पंचक्रोशीतील गावकऱ्यांसाठी कोठारी येथे सतत तीन दिवस ‘साद माणुसकीचा’ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात ते बोलत होते. ग्रामीण भागातील आरोग्याची समस्या लक्षात घेता बालक, ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर प्राथमिक शाळा कोठारी येथे पार पडले. या शिबिरात पुणे येथील डॉ. रोहिणी बुटले, डॉ. अनिल पटले, डॉ. प्रिती चौहान, डॉ. पल्लवी डोंगरे, डॉ. विनोद सवाईतुल, डॉ. बलवंत कोवे, डॉ. प्रकाश नगराळे, डॉ. नितीन पेंदे व डॉ. नितीन गायकवाड यांनी जवळपास ३०० रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केला.
युवकांना शिक्षण घेण्यात गोडी निर्माण व्हावी व नोकरी, व्यवसायासाठी आवश्यक कौशल्याचे मार्गदर्शन मिळावे, यासाठी फुले-आंबेडकर सभागृहात युवा संवाद व कौशल्य विकास कार्यशाळा पार पडली. यात डॉ. उमेश कणकवलीकर यांनी युवकांशी थेट संवाद साधला. तीन दिवसीय समारोपीय कार्यक्रमाला प्रा. उपलंचीवार, साद माणुसकीची फाऊंडेशनचे हरिश बुटले, डॉ. रोहिणी बुटले, सरपंच मोरेश्वर लोहे, गणिततज्ञ रवी वरे, पं. स. सदस्य सोमेश्वर पद्मगिरीवार यांची प्रमुख उपस्थिती होती. संचालन सतीश बावणे तर आभार अभय बुटले यांनी मानले.
विद्यार्थ्यांसाठी डिजिटल ग्रंथालयाचे लोकार्पण
शहरातील विद्यार्थ्यांना पालकांकडून व शासकीय यंत्रणेकडून अनेक सोयी उपलब्ध आहेत. त्यामुळे खेड्यातील युवकांपेक्षा कित्येकपटीने शहरातील विद्यार्थी विविध क्षेत्रात उंच भरारी घेत आहेत. मात्र त्यात ग्रामीण विद्यार्थी असुविधेपोटी माघारत आहे. स्पर्धा परीक्षेची उपयुक्त माहिती मिळावी यासाठी कोठारीत ईश्वरलाल परमार यांच्या प्रयत्नातून ग्रंथालयासाठी पाच संगणक संच, प्रवीण मसाले सुहाना ग्रुपतर्फे २० खुर्च्या, रूरल रिलेशन पुणेकडून बाल, वाचक व पालकांसाठी २५ हजारांची पुस्तके, दीपस्तंभ फाऊंडेशन जळगावकडून विविध स्पर्धा परीक्षेची २० हजारांची पुस्तके प्राप्त झालीत. त्यामुळे कोठारी येथे डिजिटल राधा-बापू ग्रंथालयाचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.