पोलीस म्हणू की जनतेच्या हाकेला धावून आलेला देवदूत! सदाभाऊ खोत यांनी विरुर पोलिसांचं केलं कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2022 06:07 PM2022-07-14T18:07:53+5:302022-07-14T18:46:24+5:30
राजुरा तालुक्यातील चिंचोली येथील नाल्याच्या पुरात एक खासगी प्रवासी बस अडकल्याने तब्बल ३५ प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. मात्र, विरूर पोलिसांनी धाडसी कामगिरी दाखवीत प्रवाशांचे प्राण वाचविले.
चंद्रपूर : गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे राजुरा तालुक्यातील अनेक गावांतील शेती पुराच्या पाण्याखाली आली असून, गावागावांतील ओढ्यांना सर्वत्र पूर आला आहे. अशातच राजुरा तालुक्यातील चिंचोली येथील नाल्याच्या पुरात एक खासगी बस अडकली व ३५ प्रवाशांचा जीव धोक्यात आला. यावेळी विरूर पोलिसांनी धाडसी कामगिरी दाखवीत प्रवाशांचे प्राण वाचविले. पोलिसांच्या या कामगिरीचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.
महाराष्ट्रातील तेलंगणा सीमेलगत येणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या राजुरा तालुक्यातील चिंचोली येथील नाल्याच्या पुलावर पाणी वाहत होते. मध्यप्रदेशातून येणारी ही ट्रॅव्हल्स हैदराबादकडे जात होती. बुधवारी सकाळीच पोलिसांनी हा मार्ग पूर्णपणे बंद केला होता; परंतु ट्रॅव्हल्सच्या चालकाने सूचनेकडे दुर्लक्ष करून बस पाण्यात घातली. मात्र पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने बस नाल्यातच अडकली. त्यामुळे प्रवासी जिवाच्या आकांताने आरडाओरड करू लागले. याबाबत माहिती मिळताच गावकऱ्यांनी विरूर पोलिसांना माहिती देताच. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. विरुर पोलीस ठाण्याच्या पथकानं सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल चव्हाण यांच्या नेतृत्त्वात अंधारातच बचावकार्य सुरु केलं.
अडकलेल्या ३५ प्रवाशांमध्ये लहान मुलांची संख्या अधिक होती. त्यामुळे आधी मुलांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर इतर प्रवाशांनाही विरूर पोलिसांच्या पथकाने सुखरूप बाहेर काढले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून जीवाची पर्वा न करता ३५ प्रवाशांचे प्राण वाचविणाऱ्या चंद्रपूर पोलिसांच्या साहसी कामगिरीचे कौतुक होत आहे.
माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनीही ट्विट करून विरूर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
पण स्थानिक पोलिसांनी पुरात अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) July 14, 2022
.
सलाम ह्या वीरांच्या कार्याला!
'पोलीस म्हणू की जनतेच्या हाकेला धावून आलेला देवदूत! विरुर पोलीसांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता केलेलं मदतकार्य अभिमानास्पद बाब आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील विरुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिंचोली नाला इथे बस बंद पडल्याने ३५ प्रवाशी पुरात अडकले. पण स्थानिक पोलिसांनी पुरात अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. सलाम ह्या वीरांच्या कार्याला!.. असे ट्विट सदाभाऊ खोत यांनी केले.
चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टी
मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा फटका जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात बसला आहे. जिल्ह्यातील वर्धा, पैनगंगा, इरई, झरपट नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. बुधवारी सकाळपासून इरईचे धरणाचे सातही दरवाजे सव्वा मीटरने उघडल्याने इरई नदीचे पाणी चंद्रपूर शहरातील काही भागात शिरले. परिणामी नागरिकांना घर सोडावे लागले. नदीचे पाणी वाढत असल्याने पूरपरिस्थिती बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
येथे करा संपर्क
घडलेल्या घटनेची आपत्तीची माहिती तत्काळ जिल्हा तसेच तालुका नियंत्रण कक्षाला द्यावी. यासाठी चंद्रपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूरच्या ०७१७२-२५१५९७ या क्रमांकावर नियंत्रण कक्षात संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अजय गुल्हाने आणि निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी केले आहे.